बीड : राज्यात बेरोजगारी वाढत असतानाच सरकारी नोकर भरतीमधील अनेक गैरप्रकार आता समोर येत आहेत. आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेला गोंधळ असेल किंवा म्हाडाची रद्द झालेली परीक्षा, या प्रत्येक ठिकाणी सरकारची अब्रू गेलेली असतानाच आता टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नोकर भरतीच्या बाबतीत सरकारच फेल होत असल्याचे चित्र असून बेरोजगारांच्या भावनांची सरकारच चेष्टा उडवीत असल्याची भावना वाढीस लागलेली आहे.
राज्यात फडणवीसांचे सरकार असताना महापरीक्षा पोर्टलबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या , त्यावेळी खा. सुप्रिया सुळेंपासून आ. रोहित पवारांपर्यंत अनेकांनी त्या सरकारच्या नोकरभरतीच्या पद्धतीबद्दल ओरड केली होती, त्यावेळच्या जनभावनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या पद्धतीत बदल होईल अशी लाखो बेरोजगारांना अपेक्षा होती. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने तर भरतीच्या बाबतीत ढिसाळपणाचे नवे विक्रम नोंदविले आहेत.
सरकारी जागा निघाल्या की त्याच्यासाठी पैशांची चर्चा नेहमीच होत असते. अशावेळी सरकार नावाच्या यंत्रणेने ठोस संदेश द्यायचा असतो. मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार यात कमी पडले आहे. एकतर सरकारी भरतीची कामे खाजगी कंपन्यांच्या हवाली करण्यात आली आहेत, आणि त्या कंपन्यांच्या प्रमाणैकपणाची अवस्था काय आहे हे म्हाडा आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेत आरोपी कोण कोण आहेत यावरून समोर आली आहेच. भरतीच्या प्रक्रियेतील अधिकारी आणि खाजगी कंपन्याच दलाल कसे पोस्टात हे आता उभ्या महाराष्ट्राने पहिले आहे. सहायक संकचालक दर्जाचे अधिकारी पेपर फोडणार असतील , खाजगी कंपन्या पेपर फोडणार असतील आणि आता टीईटीच्या परीक्षेत गूण वाढवून देण्याच्या प्रकारातही बडे अधिकारी सहभागी असतील तर विश्वास ठेवायचा कोणावर? शिपायापासून बड्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वानीच दलाल संभाळलेत आणि सरकारला याची काहीच कल्पना नसेल तर मग या साऱ्या प्रकारात सरकारच सपशेल फेल झाले आहे.
अशी दलाली खपवून घेतली जाणार नाही , त्यासाठी कठोर कारवाई केली जाईल असा संदेश देण्यासाठी सरकारने काय केले ? जे लोक परीक्षेचा पेपर फोडून बेरोजगारांच्या भावनांशी खेळात आहेत, त्यांच्यावर मोक्का सारखी कारवाई करायला काय हरकत आहे ? पण सरकार काहीच करीत नाही, इतकेच नाही तर जे अधिकारी अटक झाले आहेत, त्यांचे अद्याप निलंबन देखील होत नाही,(बीडमध्ये शिपायाचे निलंबन मात्र जिल्हा शल्य चिकित्सक दर. साबळे यांनी तडकाफडकी केले, पण इतरांच्या बाबतीत त्यांना अधिकार नाहीत ) सरकार कागदाची वाट पाहणार आणि याकाळात हे दलाल बेरोजगारांच्या भविष्याची वाट लावणार असे सारे होत आहे. सरकार नावाच्या यंत्रणेची भीति आणि धाक संपलेला आहे. आता या आरोपींना आणखी कोणाकोणाचे आशीर्वाद होते हे देखील समोर यायला हवे. मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्यावर त्यावेळी शरद पवारांपासून अनेकजण टीका करीत होते, आता महाराष्ट्र्रातील या घोटाळ्यांचे काय ?