अंबाजोगाई : मोठमोठ्या राजकारण्यांबद्दल तक्रारी करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी बीड जिल्ह्यात येऊन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जगमित्र कारखान्यातील ८३ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला. धनंजय मुंडे यांनी या ८३ कोटींचा हिशोब द्यावा अशी मागणीही सोमय्या यांनी केली. मात्र ज्यावेळी इनामी जमीन गैरव्यवहारापासून ते पन्नगेश्वर आणि जिल्हा बँकेबाबतच्या भाजप नेत्यांशी संबंधित तक्रारींवर मात्र 'माझ्याकडे कागद आला नाही, तक्रार असेल तर ठाकरे सरकारने कारवाई करावी ' असे म्हणत बगल दिली .
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी बीड जिल्ह्याचा दौरा केला. सोमय्या बीडला येण्यापूर्वीच त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या जगमित्र कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते. आपण याच संदर्भात बीड जिल्ह्यात येत असल्याचेही जाहीर केले होते,. त्यानुसार गुरुवारी सोमय्यांनी पूस येथील कारखान्याच्या जागेवर भेट दिली. त्यानंतर बर्दापूर पोलीस ठाण्यालाही सोमय्यांनी भेट दिली.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. जगमित्र मधील ८३ कोटींचा होशोब धनंजय मुंडे यांनी द्यावा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तरी ठाकरे सरकारने जगमित्र संदर्भात धनंजय मुंडे यांची चौकशी करावी असे सोमय्या म्हणाले. मात्र त्याचवेळी पत्रकारांनी त्यांना बीड जिल्ह्यातील इनामी गैरव्यवहारासंदर्भात भाजपच्या नेत्यांचे नाव येत असल्याबद्दल आणि पन्नगेश्वर कारखाना गैरव्यवहार, जिल्हा बँक गैरव्यहार यांच्याबद्दलही छेडले. मात्र यासाऱ्याचं प्रश्नावर 'माझ्याकडे यासंदर्भात काहीच कागद नाहीत , त्याशिवाय मी काय बोलणार ' असे म्हणत या प्रश्नांना बगल दिली. तसेच यासंदर्भात तक्रारी असतील तर ठाकरे सरकारने याची चौकशी करावी असे सोमय्या म्हणाले.
एसपी शासनाचे की धनंजय मुंडेंचे ?
बीडच्या पोलीस अधीक्षकांवर देखील किरीट सोमय्यांनी जोरदार टीका केली. किरीट सोमय्यांना ते बीड जिल्ह्यात येण्यापूर्वीच धमक्या आल्याचे त्यांनी जाहीर केले होते. यासंदर्भात सोमय्यांनी बीडच्या एसपींशी संपर्क साधला त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही असा आरोप सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच बीडचे एसपी हे शासनाचे आहेत का धनंजय मुंडेंचे असा सवाल देखील सोमय्यांनी केला.