बीड : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे शासन आणि प्रशासन वेगवेगळ्या मोहीम हाती घेत असतानाच नगर पालिकेच्या दुर्लक्षाने शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी नागरिकांचे आरोग्याचं धोक्यात आणले आहे. बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा काठावर सर्रास वैद्यकीय कचरा टाकला जात आहे. मास्क, ग्लोव्ह, वापरलेली औषधी, इंजेक्शन आणि इतर साहित्य थेट बिदुसरेच्या काठावर फेकले जात आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात प्रशासनाने सांगून देखील नगर पालिका हा विषय गांभीर्याने घ्यायला तयार नाही.
बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीच्या काठावर सुभाष रोड ते एमआयडीसी रोड या भागात चौपाटी विकसित करायची म्हणून रस्ता करण्यात आला. मात्र चौपाटी विकसित होणे तर दूर , या परिसराला डम्पिंग ग्राउंड चे स्वरूप आले आहे. खुद्द नगर पालिकेच्या गघंटा गद्याचा या ठिकाणी कचरा टाकत आहेत. त्यामुळे बिंदूसरेच्या काठावरील या रस्त्यावर सर्वत्र कचऱ्याचे साम्र्याज्य आहे.
आता तर यावरही कहर झाला आहे. बिंदुसरा काठावर चक्क वैद्यकीय कचरा आणून टाकला जात आहे. प्लॅस्टिकच्या बॅगेत भरून किंवा गट्ठे करून दवाखान्यातील मास्क, ग्लोव्ह , कपडे , वापरलेली औषधे, रिकामे खोके, सिरिंज , वापरलेल्या इंजेक्शन च्या रिकाम्या बाटल्या आणि असेच खूप प्रकारचे साहित्य सर्रास नदी काठावर फेकले जात आहे. याकडे नगर पालिका लक्ष द्यायला तयार नाही.
महसूल अधिकाऱ्यांनी घेतली दखल, मात्र नगर पालिकेला वेळ नाही
दरम्यान या संदर्भात बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी बीडचे उपविभागीय अधिकारी आणि नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घटना स्थळी भेट देण्याबाबत सूचना केल्याचे सांगितले. यानंतर अर्ध्या तासाने उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या सूचनेवरून बीडमधील तलाठ्यांनी घटना स्थळी भेट दिली. उपविभागीय अधिकारी टिळेकर यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सदर कचरा जप्त करण्याचे सांगितले. मात्र रात्री उशिरापर्यंत मुख्याधिकारी तर सोडाच पण नगर पालिकेचे कर्मचारी देखील बिदुसरेच्या काठावर आले नव्हते.
कचऱ्याची तपासणी व्हावी
सदर वैद्यकीय कचरा कोणी टाकला याचा शोध लागणे गरजेचे आहे. त्याठिकाणी जो कचरा आहे त्यात औषधाचे रिकामे खोके, इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या , सिरिंज आदी साहित्य आहे. इतर सर्जिकल साहित्याचे कव्हर आहेत. त्यावरील बॅच नंबरवरून सदर साहित्य नेमक्या कोणत्या ठिकाणचे आहे याचा शोध घेतला जाऊ शकतो. मात्र प्रशासनाने तितक्या गांभीर्याने हा विषय घेण्याची गरज आहे.