मुंबई-भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde ) यांची आज जयंती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यानिमित्ताने गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना भाजपा नेत्यांवर निशाणा साधला. ज्यांच्याशी संवाद साधता येईल, राज्याचं राजकारण समजेल आणि शिवसेना काय आहे हे माहिती असणारा एकही नेता आज भाजपात दिसत नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“गोपीनाथ मुंडे असते तर आज राज्याचं राजकारण वेगळं असतं. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती राहावी यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. आज राज्याचं राजकारण समजणारा, ज्याच्याशी संवाद साधता येईल आणि शिवसेना काय आहे हे माहिती असणारा गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा नेता भाजपात दिसत नाही. आम्ही त्यांच्यासोबत २५-३० वर्ष फार जवळून काम केलं. तेसुद्धा एक लोकप्रिय नेते होते. आज बहुजन समाजाची चळवळ दिसत आहे त्याचे ते प्रणेते आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. “महाराष्ट्राचे, देशाचे सर्वात ज्येष्ठ, अनुभवी नेते म्हणून आम्ही शरद पवारांकडे पाहतो. महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवारांचं मोठं योगदान आहे. देशाचे संरक्षणमंत्री, कृषीमंत्री असताना या दोन्ही क्षेत्रात हा देश आत्मनिर्भर व्हावा म्हणून त्यांनी त्यावेळी अनेक पावलं टाकली. ते प्रचंड लोकप्रपिय, जनतेशी थेट संबंध असलेले आणि राजकारणात असूनही हवेत गप्पा न मारणारे असे नेते आहेत,” असं कौतुक संजय राऊत यांनी यावेळी केली.