मुंबई : मानवतेस काळिमा फासणाऱ्या हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले. उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर मध्यरात्री परस्पर अंत्यसंस्कार करून या भयनाटय़ात भर टाकून आणखी रोष ओढवून घेतल्याचे बुधवारी समोर आले. १९ वर्षांच्या तरुणीवर १५ दिवसांपूर्वी हाथरसमधील चौघा उच्चवर्णीयांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. त्यातच आता शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याप्रकरणामध्ये दोषींना कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी करणारं पत्र पाठवलं आहे. गोऱ्हे यांनीच यासंदर्भातील माहिती ट्विटवरुन दिली आहे.
या प्रकरणाची पोलिसांकडून योग्य प्रकारे आणि सखोल चौकशी करण्यात यावी अशी मी मागणी करते. या प्रकरणामधील काही गोष्टींची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे, असं म्हणत गोऱ्हे यांनी सहा महत्वाचे मुद्दे पत्रामध्ये मांडले आहेत.
गोऱ्हे यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे…
१) आरोपींना जामीन मिळता कामा नये.
२) या प्रकरणामध्ये पीडितेची बाजू मांडण्यासाठी सरकारने सक्षम आणि अनुभवी वकीलाची नेमणूक करावी
३) या प्रकरणासंदर्भातील योग्य पुरावे गोळा करण्यात यावेत
४) स्थानिक पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींना योग्य ती सुरक्षा पुरवली पाहिजे
५) या प्रकरणाची चार्टशीट वेळेत न्यायालयामध्ये दाखल करावी
६) उत्तर प्रदेश सरकारने आरोपींना फाशीच्या तख्तापर्यंत पोहचवण्यासाठी सर्व ती कायदेशीर मदत करावी