करोनाची साथ सुरू झाल्यानंतर सर्वात आधी धारावीमध्ये त्याची दहशत पसरली. मोठ्या प्रमाणावर धारावीकर करोनामुळे बाधित होऊ लागल्याचं दिसून आलं. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला धारावीतील करोना नियंत्रणात आणण्यासाठी वेगळं नियोजन करावं लागलं. बऱ्याच प्रयत्नांअंती धारावीतील करोना नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर आता धारावीमध्ये जगभर दहशत निर्माण केलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा करोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून तातडीने पावलं उचलण्यात येत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
एएनआयनं धारावीत ओमायक्रॉनचा रुग्ण आढलल्याचं वृत्त देण्यात आलं आहे. ही व्यक्ती नुकतीच टांझानियामधून परतली होती. काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत सापडलेला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण देखील नुकताच टांझानियामधून परतला होता. त्यामुळे टांझानिया ओमायक्रॉनचं नवं केंद्र बनतंय की काय, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, धारावीत सापडलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णाला तातडीने सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.धारावीत आज सापडलेल्या रुग्णामुळे आता महाराष्ट्रात सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ११ वर गेली आहे. गुजरातमध्ये ओमायक्रॉनचे ३ रुग्ण आहेत.