मुंबई : इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीच्या कॉलेज निश्चितीच्या अंतिम तारखेच्या दिवसापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.
प्रवेशाच्या पहिल्या फेरीत तात्पुरत्या स्वरूपात जात वैधता प्रमाणपत्राच्या ऑनलाइन पावती सादर करून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करता येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या पदवी व पदव्युत्तर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश वेळी जात वैधता प्रमाणपत्र कॉलेजेसमध्ये दाखल करण्यामध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. त्यातच इंजीनिअरिंग प्रवेशाच्या पहिल्या फेरीची कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठीची आज शेवटची तारीख होती.
प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असताना आणि हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वेळ लागत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारी पाहता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मुदत वाढ दिली आहे.ज्या विद्यार्थ्यांना त्या-त्या राखीव प्रवर्गातून गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला आहे त्यांनी आपला प्रवेश पहिल्या फेरीसाठी निश्चित करायचा आहे. यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची ऑनलाईन पावती प्रवेश निश्चित करत असताना सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे
याशिवाय दुसऱ्या फेरीसाठी सुद्धा प्रवर्गातून मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करून दुसऱ्या फेरीच्या प्रवेश निश्चितीच्या अंतिम तारखेच्या आत संबंधित उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्राची प्रत सादर करणे बंधनकारक असेल.