बीड : अंबाजोगाई नररपालिकेविरोधात नगरसेवक आणि आ. नमिता मुंदडा यांनी गाळ काढणे, नाली बांधकाम आदींमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याच प्रकरणात अंबाजोगाईत नगरसेवकांनी उपोषण देखील सुरु केले आहे. मात्र आता दोन्ही तक्रारीत अपहार झाल्याचे सिद्ध होत नसल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांनी गठीत केलेल्या समितीने दिला आहे. यामुळे नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अंबाजोगाई नगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र मागच्या काही काळात नगरपालिकेत अनेक कामात अपहार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. काही नगरसेवक आणि आ. नमिता मुंदडा यांनी यासंदर्भात शासनाकडे तक्रारी देखील केल्या होत्या. त्यावर विभागीय आयुक्तांनी सहायक आयुक्त डॉ. नीलम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने गाळ काढण्याच्या कामासंदर्भात करण्यात आलेल्या अपहाराच्या तक्रारीची आणि बोगस नाली बांधकामाच्या तक्रारीची चौकशी केली. यात गाळ काढण्याचे काम जास्त दराने केलेले नाही तसेच नाली बांधकाम देखील गुणवत्ता नियंत्रकांनी समाधानकारक म्हटले असल्याचे निरीक्षण नोंदवत समितीने अपहार झाला नसल्याचे म्हटले आहे.
कामे तोडण्यात नियमभंग
नाली बांधकामामध्ये अपहार झाला नसला तरी नियमाप्रमाणे कामे तोडून कार्यात आदेश देता येत नाहीत, मात्र तसे देण्यात आले , हा नियमभंग असून यासंदर्भात जबाबदारी निश्चित करण्याची शिफारस समितीने केली आहे.