बीड-नगरपालिकेच्या गलथानपणाचा कारभार आणि भ्रष्टाचारा विरोधात ९ डिसेंबर रोजी शिवसंग्रामच्या वतीने नगरपालिकेवर 'जन आक्रोश' मोर्चा आ.विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार होता. परंतु आ. विनायकराव मेटे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते या मोर्चाला उपस्थित राहू शकणार नसले तरी हा मोर्चा निघणार असून यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. या वेळी शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, ज्येष्ठ नेते खालेक पेंटर, युवक जिल्हा अध्यक्ष रामहरी मेटे , सुहास पाटील, ॲड. राहुल मस्के हे उपस्थित होते .बीड नगरपालिकेमध्ये क्षीरसागर कुटुंबाची मागील ३५ वर्षापासून सत्ता आहे. त्यांची स्वतःची वैयक्तिक मालकी असल्यासारखा नगरपालिकेचा कारभार हे करत असल्याची टीका प्रभाकर कोलंगडे यांनी केली. ऐन पावसाळयामध्ये सुध्दा १५ -१५ दिवस पाणी बीडकरांना मिळत नाही, शहरामध्ये स्वच्छता नाही,जागोजागी कचरा पडलेला दिसतो.गल्ली बोळामध्ये नाल्या नाहीत,जिथे आहेत तिथे नाले सफाई होत नाही, कचरा उचलला जात नाही, रस्त्यासाठी वाटेल तेवढा निधी आला पण एकही रस्ता नीट केला नसून नगरपालिकेच्या गलिच्छ कारभारामुळे आणि क्षीरसागर कुटुंबाच्या भ्रष्टाचारा विरोधात शिवसंग्रामच्या वतीने 'जनआक्रोश' मोर्चा काढण्यात येणार असून यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन प्रभाकर कोलंगडे यांनी केले.