ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. त्यांना २९ नोव्हेंबर रोजी तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ३० नोव्हेंबरला त्यांची मुलगी अभिनेत्री मल्लिका दुआने वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती दिली होती. आताही मल्लिकाने इंस्टाग्राम पोस्ट करत वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली.
कोण आहेत विनोद दुआ?
विनोद दुआ यांनी १९७४ मध्ये दूरदर्शनपासून कामाला सुरुवात केली. पुढे त्यांनी एनडीटीव्ही, सहारा अशा इतरही वृत्तवाहिन्यांसोबत काम केलं. काही काळाने त्यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी काढून विविध वृत्तवाहिन्यांसाठी कार्यक्रम सादर केले.
विनोद दुआ यांचा जन्म तेव्हाच्या डेरा इस्माईल खान आणि सध्याच्या पाकिस्तानातील खैबर-पख्तुन्वा प्रांतातला आहे. त्यांचं बालपण निर्वासितांच्या छावणीत गेलं. त्यांनी बोफोर्स प्रकरणात घेतलेल्या विविध मंत्र्यांच्या मुलाखती चांगल्याच गाजल्या. त्यांच्या पत्रकारितेतील कामासाठी त्यांना रामनाथ गोएंका आणि पद्मश्री अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलंय.