Advertisement

'स्वराती'त कोरोना काळातील गैरव्यव्हारावर (scam ) चौकशी समितीचे शिक्कामोर्तब

प्रजापत्र | Friday, 03/12/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई : कोरोना काळात मिळालेल्या निधीतून  काम करण्यात आल्याचा प्रकार अंबाजोगाईच्या 'स्वाराती' रुग्णालयात उघड  झाला  आहे. ऑक्सिजन पाईपलाईनच्या कामात रुग्णालय प्रशासनाने नियमांचे पालन केले नाही आणि काही प्रकरणात कंत्राटदारांना जास्तीची रक्कम दिली असा अहवाल अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यासह जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी असे निर्देश औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना दिले आहेत. सदर प्रकरणात आ. नमिता मुंदडा यांच्या तक्रारीवरून चौकशी झाली होती. 
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने कोविड काळात उभारण्यात आलेल्या स्वतंत्र कोविड अतिदक्षता विभाग व कोवीड च्या इतर कक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांना तातडीने ऑक्सीजन पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी  ऑक्सीजन पाइपलाइन चे काम करण्यात आले होते . सदरील कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला असल्याची तक्रार या विभागातील आ . नमिता मुंदडा यांनी केली होती . यावर अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या  अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. 
समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असून आपल्या अहवालात ऑक्सिजन पाइपलाइनसाठी निविदा देताना कोणत्याही प्रचलित कार्यपद्धतीचे पालन करण्यात  आले नसल्याचा ठपका ठेवला आहे. स्वाराती प्रशासनाने या प्रक्रियेत बेजबाबदारपणा केल्याचे आणि नियमबाह्य काम केल्याचे समितीने म्हटले आहे. 
तसेच आउटलेट खरेदीसाठी १४५० रुपयांचा दर असताना २५५० रुपये दराने पैसे अदा केले गेले १ लाख ६९ हजाराचे नुकसान झाल्याचे समितीने म्हटले आहे. तसेच इतर दोन प्रकरणात सुमारे साडेसात लाखाचे अतिप्रदान करण्यात आले होते, मात्र ती रक्कम वसूल करण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे. 
समितीच्या या अहवालानंतर औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना या  स्वाराती रुग्णालयाच्या तत्कालीन अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे कळविले आहे. यामुळे रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Advertisement

Advertisement