बीड-एसटी कर्मचाऱ्यांनी विलनीकरणाच्या मागणीवर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील बस सेवा अडचणीत सापडली आहे.परिवहन मंत्र्यांनी वेतनवाढ दिल्यानंतर जे कर्मचारी अद्याप कामावर रुजू झाले नाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुरु असून बीडमधील चालक आणि वाहक संपवार ठाम आहेत.गुरुवारी (दि.२) राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय महासंचालक शेखर चन्ने हे बीडमध्ये आले होते,त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांची अडचणी जाणून घेत संप मागे घेण्याचे आवाहन केले.मात्र कर्मचारी विलनीकरणावर ठाम असल्यामुळे संप संपता संपेना असे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या एक महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर असल्याने या संपामुळे वाहतूक पुर्णत: खोळंबून पडली. महामंडळाचे महिनाभरात कोट्यवधींचे नुकसान झाले. कर्मचारी संघटना विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संपाबाबत तोडगा निघेना. महामंडळाचे महासंचालक शेखर चन्ने हे कालपासून मराठवाड्याच्या दौर्यावर आहेत. त्यांनी बुधवारी (दि.१) औरंगाबाद येथील एसटीच्या कर्मचार्यांशी संवाद साधल्यानंतर ते गुरुवारी (दि.२) बीड येथे दाखल झाले. बीड येथे आंदोलनकर्त्यांची त्यांनी भेट घेऊन संपाच्या संदर्भात चर्चा केली. या वेळी कर्मचार्यांसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कर्मचारी आणि महासंचालक यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आहे.यावेळी चन्ने यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे संप सुरूच राहणार असून जिल्ह्यातील बस सेवा पूर्ववत होण्यास मोठा कालावधी लागणार असल्याचे चित्र आहे.