Advertisement

310 गावातील 30 हजार शेतकर्‍यांचे पीक गेले ,कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल

प्रजापत्र | Tuesday, 29/09/2020
बातमी शेअर करा

बीड दि.28 (प्रतिनिधी) : जिल्हयात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल समोर आला असून तब्बल 310 गावांमधील 30 हजार शेतकर्‍यांचे पीक गेल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. तब्बल 23 हजार 846 हेक्टरवरील पीकांना फटका बसला असून यात सर्वाधिक नुकसान कापसाचे तर त्या खालोखाल सोयाबिनचे झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी शेतकर्‍यांच्या शेतात पाणी साचून राहिले. मागील पंधरवाड्यात पावसासोबतच वादळीवारे देखील होते त्याचा फटका ऊस आणि बाजरीसारख्या पिकांना बसला असून त्या वार्‍यात हे पीक अक्षरश: भुईसपाट झाले. 
अतिवृष्टी, वादळीवारे आणि सततचा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्यशासनाने दिले होते. त्यामुळे कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आला असून त्यात बीड जिल्ह्यातील 23 हजार 846 हेक्टर वरील पीकाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तब्बल 310 गावे बाधित झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. यात गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसत आहे. 
पीक विमा कंपनीकडे तक्रार 
ज्या शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे किंवा पुरपरिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी आपल्या नुकसानीची माहिती तातडीने पीक विमा कंपनीकडे द्यावी असे आवाहन अधिक्षक कृषी अधिकार्‍यांनी केले आहे. शेतकर्‍यांनी आपल्या नुकसानीची माहिती नजीकच्या तालुका कृषी कार्यालयातील विमा कंपनीच्या प्रतिनिधीला द्यावी आणि त्या अर्जाची पोच घ्यावी असे अधिक्षक कृषी अधिकार्‍यांनी म्हटले आहे. 
आपण स्वत: या तक्रारीचा पाठपुरावा करणार असल्याचे जनआंदोलनच्या वतीने अ‍ॅड.अजित देशमुख यांनी देखील म्हटले आहे.

Advertisement

Advertisement