बीड-परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेतनवाढ दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते.तसेच जे कर्मचारी कामावर येणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता.कारवाईच्या भीतीपोटी अनेक कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला.बीडमध्ये जे कर्मचारी कामावर रुजू झाले त्यांना बस घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या. मात्र बस स्थानकाच्या बाहेर काढायचे म्हटले तर संपकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.आणि नाही जायचे तर अधिकाऱ्यांचे आदेश कसे मोडायचे ? असा प्रश्न अनेकांना पडतोय,आणि यातून रविवारी सकाळी गोरख कारंडे यांना रक्तदाबाचा त्रास झाल्याची माहिती आहे.सकाळी त्यांना बस घेऊन जाण्याचे सांगण्यात आले होते,मात्र गेटवर कर्मचारी उभा असल्यामुळे त्यांची व्दिधा मनस्थिती झाली होती आणि तणावातून त्यांना रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांची प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून अधिकारी आणि संपकऱ्यांमुळे मात्र इतरांच्या अडचणी चांगल्याच वाढल्याचे चित्र आहे.
बातमी शेअर करा