बीड : बीड जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ जमिनीचे मोठ्याप्रमाणावर बेकायदा खरेदीविक्री व्यवहार झालेले आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून भूमाफियांनी मोठ्याप्रमाणावर जमिनी लाटल्या आहेत. यातील वक्फ जमिनीची काही प्रकरणे समोर आल्यानंतर आणि काही प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रशासन सर्वच बाबतीत जागे झाले आहे. हिंदू देवस्थान च्या ज्या जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत, आणि ज्या व्यवहारांना महसूल विभागाची मंजुरी नव्हती प्रकरणात कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे असे सर्वच व्यवहार अडचणीत आले आहेत. यामुळे ज्यांनी देवस्थानच्या जागा परस्पर विकत घेतल्या आहेत अशांना त्या जागा सोडून द्याव्या लागतील अशी परिस्थिती आहे.
बीड जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी आहेत. यात वक्फच्या जमिनींचे नियंत्रण वक्फ बोर्डामार्फत केले जाते तर हिंदू देवस्थानच्या जमिनींची नोंद ही धर्मादाय कार्यालयांकडे आहे. धर्मादाय कार्यालयाकडे या जमिनीची नोंद असली तरी देवस्थान जमिनींची विक्री करण्यापूर्वी महसूल विभागाची म्हणजे शासनाची परवानगी आवश्यक आहे. मात्र बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी केवळ धर्मादाय विभागाची परवानगी घेऊन देवस्थान जमिनीची विक्री झाली आहे.
देवस्थानच्या या जमिनीवर आता अनेक ठिकाणी भूमाफियांनी प्लॉटिंग केलेली आहे. अनेक गोरगरिबांच्या माथी या जमिनी मारलेल्या आहेत. त्यावर त्यांची घरे झाली आहेत. मात्र आता प्रशासनाने अशा साऱ्या जमिनींची माहिती जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. हिंदू देवस्थानच्या जमिनीचे हस्तांतरण महसूल विभागातील सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय होऊ शकत नाही, म्हणून जेथे असे विनापरवानगी हस्तांतरण झाले आहे त्या सर्व प्रकरणात कारवाई करण्याचे निर्देश औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नुकतेच एका बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात असे सारे व्यवहार रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.