Advertisement

संधी आणि आव्हानही

प्रजापत्र | Monday, 28/09/2020
बातमी शेअर करा

संजय मालाणी : 

बीड :विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात काहीश्या बाजूला पडलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी देऊन पक्षाने  पुन्हा सक्रिय करण्याची भूमिका घेतली आहे. पक्षात आणि राजकारणात अनेक संघर्षावर आणि अडथळ्यांवर मत करत आलेल्या पंकजा मुंडे यांच्या साठी हि आणखी एक संधी असली तरी ते तितकेच मोठे  आव्हानही असणार आहे. 
 भाजपच्या विस्तारात मुंडे- महाजनांचे योगदान अर्थातच मोठे आहे. मात्र भाजपकडून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनाही वेगवेगळ्या कसोट्यांना सामोरे जायला भाग पाडले  गेले होते. महाजनांची सुद्धा भाजप सर्वकाळ अनुकूलच होते असे नाही आता दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या  तथा प्रमोद महाजनांची भाच्ची असलेल्या ,माजी  मंत्री पंकजा मुंडे यांच्या बाबतीतही पक्षातील शह काटशहाचे राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडे यांनी राज्यभर संघर्ष यात्रा काढली होती. ९३-९४ साली गोपीनाथ मुंडेंनी  काढलेल्या संघर्ष यात्रेच्या आठवणी तब्बल  २० वर्षांनी त्यांच्या मुलीने जागवल्या होत्या. या दोन्ही संघर्ष  यंत्रांचा भाजपाल निवडणुकांमद्ये फायदा झाला. मात्र गोपीनाथरावांच्या संघर्ष यात्रेने  त्यांना उपमुख्यमंत्री पद दिले तर पितृ निधनाचे दुःख ताजे असतानाही संघर्ष यात्रा काढणाऱ्या पंकजा मुंडेंना केवळ मंत्री पदावरच समाधान मानावे लागले. ती खदखद स्वतः पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पाच वर्ष सतावत होती. त्यातूनच तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील संबंध अनेकदा ताणल्या गेले. शेवटी शेवटी तर त्यांच्यातील राजकीय मतभेद टोकाला गेले होते. महाजानादेशच्या निमित्ताने बीड मध्येच घडलेले राजकीय मानापमान नाट्य आणि त्यानंतर परळी  विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव यामुळे भाजपमध्ये पंकजा मुंडे समर्थकांची अस्वस्थता वाढीस लागली होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना आता राष्ट्रीय स्तरावरचे पद देऊन पक्षाने आपण न्याय दिला असे दाखवूनही द्यायला सुरुवात केली. 
विधानसभा निवडणुकीपासून पक्षात थोडे वेगळे पडलेल्या पंकजांसाठी हि एक नवी सुरुवात असणार आहे. राष्ट्रीय सचिव या पदाचा तास जिल्ह्याचा अथवा राज्याच्या राजकारणावर फार प्रभाव टाकता येतो असे नाही. मात्र पंकजांसारख्या संघर्षाला तयार असलेल्या नेत्याच्या दृष्टीने हे पद देखील खूप काही असते दिवंगत गोपीनाथ मुंडे हे जसे प्रत्येक पदाचे महत्व स्वतःच्या राजकीय उंची सोबत वाढवायचे अगदी तशीच भूमिका घेत आपल्या कार्यकर्त्यांसाठीं पंकजा मुंडेंना पुन्हा सक्रिय होण्यासाठी एक स्टेज या निमित्ताने मिळाले आहे. अर्थात राजकारणात पुन्हा उभारी घेण्यासाठीची हि संधी असली तरी हे पद तितकेच मोठे आव्हान देखील ठरणार आहे. राष्ट्रीय सचिव पदाच्या जवाबदारीत पंकजा मुंडे यांच्याकडे कोणत्या राज्याची जबाबदारी येणार हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. पंकजा मुंडे यांच्या सोबतच राज्यातून विनोद तावडेना देखील  संधी देण्यात अली आहे. मात्र खडसेंना पक्षाने बाजूलाच ठेवले आहे. पंकजा मुंडे,विनोद तावडे,एकनाथ खडसे हे सारेच तसे एका गटातील मानले जातात त्यामुळे पंकजा मुंडेंना स्थान मिळाले म्हणजे लगेच राज्यातील पक्षांतर्गत राजकारण थंडावेल असे नक्कीच नाही. एकीकडे कार्यकर्त्यांना उभारी द्यायची आणि दुसरीकडे शाहाला काटशह देत बापक्षात वर्चवस्व निर्माण करायचे आणि त्याचवेळी मतदारसंघात विरोधकाना आव्हान द्यायचे अशा सर्व पातळ्यांवर पंकजा मुंडेंना  झगडावे लागणार आहे.  
 

Advertisement

Advertisement