बीड-विलानीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आक्रमक भूमिका घेतल्याने मागील २० दिवसांपासून लालपरी रस्त्यावर धावली नसल्याचे चित्र आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि राज्य सरकारप्रमाणे इतर भत्ते देऊन संप मागे घेण्याचे आवाहन केले.एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून आज शेवटची डेडलाईन देण्यात आली होती.तसेच जे कर्मचारी कामावर रुजू नाहीत त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिल्यानंतर बीड आगारातील प्रशासकीय विभाग,यांत्रिक विभाग,चालक आणि काही वाहक अश्या १४५ जणांनी पुन्हा सेवेवर रुजू होण्याचा निर्णय घेतल्याने उद्या (दि.२७) लालपरी पोलीस बंदोबस्तात बीड बसस्थानकातून धावणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी प्रजापत्रशी बोलताना दिली आहे.
ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने बीड जिल्ह्यातील बस सेवा खोळंबली आहे.राज्य सरकारने बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ केली आहे.तसेच 'आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये. एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही आज सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर कठोर निर्णय घेऊ', असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी दिला होता. मात्र शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या एकाही आगारातून बस सुटली नाही.मात्र अनेक कर्मचाऱ्यांनी खाजगीत आपण सेवेवर रुजू होण्यास तयार असल्याचे विभाग नियंत्रक यांना सांगितले असून उद्या (दि.२७) पोलीस बंदोबस्तात लालपरी रस्त्यावर धावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे अजयकुमार मोरे यांनी 'प्रजापत्र' शी बोलताना म्हटले आहे.