Advertisement

एसटी कर्मचारी आणि राज्य सरकारच्या भांडणात प्रवासासाठी पाहावी लागतेय दोन ते अडीच तासांची वाट

प्रजापत्र | Monday, 22/11/2021
बातमी शेअर करा

बीड दि.२१ (प्रतिनिधी)-मागील १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलानीकरणाच्या मागणीवर आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यातील अनेक डेपोतून लालपरी धावली नाही.यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून बसस्थानक परिसरात पर्याय खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र दोन ते अडीच तास गाडी भरेपर्यंत वाट बघावी लागत असल्याने प्रवाशी याला पुरते वैतागले आहेत.

 

                     ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सर्व कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलानीकरण करावे या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला.यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात पर्याय व्यवस्था करण्यासाठी आरटीओ विभागाला सूचना केल्या.मात्र आरटीओ विभागाला जिल्हाभर म्हणावी तेवढी सक्षम वाहन व्यवस्था उभारण्यात यश आले नाही.तसेच खाजगी वाहनधारकांनी बस स्थानक परिसरात प्रवाशांसाठी गर्दी केली.मात्र गाडी पूर्ण भरेपर्यंत जाग्यावरून हलवली नसल्यामुळे अनेक प्रवाशांना दोन ते अडीच ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.

 

वाट पाहण्याची मनस्थिती ठेवा..

औरंगाबाद आणि पुणे वगळता इतर ठिकाणी प्रवास करायचा असेल तर बसस्थानकात किमान दोन ते अडीच तास वाट पाहण्याची मनस्थिती ठेवून घराबाहेर पडा असे चित्र आजघडीला बीड शहरात आहे.कारण औरंगाबाद आणि पुण्यासाठी खाजगी वाहनांच्या रांगा आहेत,आणि या ठिकाणी प्रवाशी संख्या ही जास्त असल्यामुळे वाट पाहण्याची फार वेळ गरज नाही.मात्र इतर जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर वाट पाहण्याची मनस्थिती ठेवण्यापलीकडे दुसरा पर्याय प्रवाशांकडे आज तरी नाही.

 

 

बसस्थानक परिसरात वाढले वाद

एसटी बस बंद असल्याने खाजगी वाहतूकदारांनी बस स्थानक परिसरात मोठी गर्दी केली आहे.प्रवाशाला 'आपल्याच' वाहनात बसविण्याची चढाओढ लागली असून शाब्दिक बाचाबाची चालकांमध्ये होत आहे.तसेच ट्रॅव्हल्स मालकांनी आपल्या दुकानावर खाजगी वाहनधारकांना थांबण्यासाठी मज्जाव केल्याचे चित्र आहे.

 

 

प्रवाशीही वैतागले संपाला

दरम्यान मागील १५ दिवसांपासून प्रवाशांची मोठी तारांबळ होत आहे.सुरुवातील हा संप दोन-चार दिवसात मिटेल असे वाटत होते.मात्र अद्याप यावर तोडगा न निघाल्याने प्रवाशांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.या संपाला आता प्रवाशी ही वैतागले असल्याचे चित्र असून राज्य सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.

 

 

...चार बसवर दगडफेक

धुळे-एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपाला झुगारून धुळे बस आगारातून आज बस सेवा सुरू करण्यात आली. सरळ भरतीत निवडलेल्या चालकांच्या माध्यमातून या बस धुळे आगारातून नरडाणा, धनूर अशा ठिकाणी पाठवल्या गेल्या. मात्र पोलीस बंदोबस्त असतानाही चार बसेसवर दगडफेक झाली आहे. या चारही बस वेगवेगळ्या मार्गावर पाठवण्यात आल्या होत्या. दगडफेकीच्या घटनांमुळे नव्याने सेवेत दाखल झालेल्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

Advertisement

Advertisement