बीड-गेल्या काही वर्षांपासून खंडेश्वरी मंदिर ते पिंपळनेर व्हाया नाथापूर, सुर्डी पर्यंत खड्डेमय रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांचे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मणके मोडण्याचे काम होत आहे. ना लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत आहेत ना प्रशासन. काही दिवसांपासून खांडे पारगाव, म्हाळसापूर, पिंपळगाव, जवळा, नागापूर खुर्द व बुद्रुक, उमरद, पिंपळनेर, इट, बेलवाडी, बाभळवाडी, बऱ्हाणपूर, सुर्डी, नाथापूर, आडगाव, गुंधा, वडगाव, सांडरवन, लोणी, शहजाणपूर, रामगाव, खुंड्रस, कुक्कडगाव, भाटसांगवी, बोरदेवी, बेडुकवाडी, नबापूर आदी ठिकाणच्या लोकांना बीडला येताना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्यामुळे हजारो ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत.
वेळोवेळी पाठपुरावा करून देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.एक खासदार, दोन आमदार, तीन जिल्हा परिषद सदस्य, चार पंचायत समिती सदस्य निवडून देणारी ही गावे सोबतच तीन पक्षांचे जिल्हाध्यक्ष याच रस्त्यावरील गावांचे रहिवाशी असताना जनतेची परीक्षा घेण्याचे काम सध्या या लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे. चार वर्षांपासून प्रलंबित हा रस्ता व्हावा यासाठी आज उमरद येथे बैठक घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय एकमताने सर्व गावच्या नागरिक व सरपंचाच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी येथील खड्ड्याचे पूजन करून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा निषेध देखील करण्यात आला. येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देखील करण्यात येईल असे रस्त्यासंबंधी युवकांनी बनवलेल्या समितीकडून जाहीर करण्यात आले.