बीड : जिल्ह्यात पुरवठा विभागातील गोंधळ काही केल्या कमी व्हायला तयार नाही. रेशनच्या धान्याला गोदामातूनच पाय फुटत असल्याचे सांगितले जात असतानाच अंबाजोगाईच्या गोदामात धान्याच्या मापातले पाप समोर आले आहे. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाईच्या गोदामात जाऊन धान्याचे ६० पोटे तपासले , मात्र त्यातील एकही ५० किलो भरले नाही. प्रत्येक पोत्यात २ ते ३ किलो धान्य कमी भरले आहे. अशीच परिस्थिती कमीअधिक फरकाने जिल्ह्यातील सर्वच गोदामांची आहे.पुरवठा विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या धान्याचा काळाबाजार ही नित्याची बाब झालेली आहे. त्यातच गोदामातूनच रेशन दुकानदारांना कमी धान्य येते अशा तक्रारी वारंवार येत असतात. मात्र वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. अशाच तक्रारींच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाईच्या धान्य गोदामाला भेट दिली. त्यांच्यासमवेत नायब तहसीलदार आणि इतरही कर्मचारी उपस्थित होते. आमदारांनी धान्य कमी येत असल्याच्या तक्रारी असल्याचे सांगून गोदामातील वेगवेगळ्या ओळींमधील सुमारे ६० पोत्यांचे वजन केले. मात्र त्यातील एकही पोते ५० किलो वजनाचे भरले नाही . सर्वच पोत्यांधील धान्य ४७ ते ४८ किलो इतकेच होते. त्यामुळे प्रत्येक पोत्यामध्ये २ किलो धान्याचा काटा मारला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषम्हणजे हे वजन देखील पोत्यासह भरले आहे. याप्रकरणात कारवाई करावी अशी तक्रार या प्रकारानंतर स्वतः आमदार नमिता मुंदडा यांनी केले आहे.
एकट्या अंबाजोगाई तालुक्यात महिन्याला ४०० क्विंटलचा घपला
आमदार मुंदडांनी गोदामात तपासणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. एकट्या अंबाजोगाई तालुक्यात महिन्याला १ हजार मेट्रिक टन धान्य वितरणासाठी दिले जाते. यातील प्रत्येक पोत्यातून २ किलो जरी धान्य कमी केले तर केवळ मापात पाप करून एका तालुक्यात महिन्याला ४०० क्विंटल धान्य एका तालुक्यातून किमान हडप केले जात आहे. ज्या ठिकाणी धान्याचे नियतं जास्त आहे, त्या ठिकाणी हहा आकडा आणखी मोठा आहे.
लेखी अहवाल येऊ द्या
यासंदर्भात बीडच्या प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी भारती सगरे यांच्याशी संपर्क साधला असता, मला तेथील अधिकाऱ्यांनी सदर प्रकार सांगितलं आहे. मात्र याचा लेखी अहवाल माझ्याकडे आलेला नाही. जोपर्यंत लेखी अहवाल येत नाही, तोपर्यंत मला काही बोलता येणार नसल्याचे सांगितले.