बीड दि.१३ (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यात कोरोनाच्या काळात औषधी आणि इतर गोष्टींवर अगोदर वारेमाप खर्च करण्यात आला. तातडीची गरज म्हणून स्थानिक पातळीवर मोठ्याप्रमाणावर खरेदी करण्यात आली. आतामात्र कोरोना काळातील औषधी आणि इतर देयकांसाठी देखील पैसे कमी पडत असल्याचे चित्र आहे. एकट्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातही औषधी,आहार आणि इतर बाबींच्या थकीत बिलांचा आकडा २० कोटींच्या घरात गेला आहे. ही देयके द्यायला जिल्हा नियोजन समितीकडे पैसे शिल्लक नसल्याने आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडे मागणी करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात कोरोनावर मोठ्याप्रमाणात खर्च करण्यात आला आहे. औषधी आणि इतर सामुग्री यावर झालेला खर्च काही कोटींच्या घरात आहे. सुरुवातीला या खर्चासाठी जिल्हा नियोजन समितीमधून तरतूद करण्यात आली होती. मात्र जिल्हा नियोजन समितीचे १०२ कोटी रुपये देखील संपले असून अजूनही कोरोना काळातील देयकांची थकबाकी वाढतच आहे. बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने आजच्या तारखेत २० कोटींच्या थकीत देयकांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आहे. जिल्हा नियोजन समितीत निधी नाही, त्यामुळे आता इतर कोणत्या माध्यमातून ही देयके द्यावीत अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने केली आहे.
मृतदेह आवेष्टनाची २१ लाखाची थकबाकी
मृतदेह पॅक करण्यासाठी जे आवेष्टन वापरले जाते त्याचे साधारण २१ लाख रुपये थकल्याचे सांगितले जात आहे. याच कामासाठी अगोदर देखील खर्च झालेला आहे. त्यामुळे अनेक बाबींवर झालेला खर्च अतिरिक्त तर नाहीना असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
आहाराचे साडेपाच कोटी
कोरोनाकाळात रुग्णांना आहार पुरविला जात होता. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत जिल्हा रुग्णालय आणि इतर काही केंद्रे कार्यरत होती. आता आहारासाठीचे साडेपाच कोटी रुपये देयक थकल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी कळविले आहे.