अंबाजोगाई दि.11 नोव्हेंबर – आडस ता. केज येथे दिवाळीच्या सुट्टीत आजोळी आलेल्या युवकाचा अंबाजोगाई येथील बुट्टेनाथ धबधब्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सांयकाळी घडली.
मुळ लातूर येथील रहिवासी असलेला अमर अनिल राडकर (वय 17) हा युवक दिवाळी सुट्टीत आडस ता.केज येथे आजोळी आला होता. काल दि.10 बुधवारी आपल्या मावस भावंडासह तो अंबाजोगाई येथील नागनाथ मंदिर व बुट्टेनाथ परिसर पाहण्यासाठी गेला.
यावेळी बुट्टेनाथ धबधब्याच्या पाण्यात फोटो काढण्याच्या नादात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. सदरील घटना लक्षात येताच सोबतच्या इतर भावंडानी आरडाओरड केला. परंतू जवळपास कुणीच नसल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अंबाजोगाई शहर पोलिसांनी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शोधकार्य सुरु केले. बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास पाण्यात मयताचे शव काढण्यात आले. शवविच्छेदनासाठी प्रेत रात्री स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. सदरील दुर्दैवी घटनेमुळे आडस गावात हळहळ व्यक्त होत आहे.