बीड : बीड जिल्ह्यात वाळू माफियांकडून सुरु असलेला नंगानाच नवीन नाही , मात्र आता जिल्ह्यात वाळू माफियांच्या बोगसगिरीने साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. गेवराई तालुक्यातील नदी पात्रातून वाळू उचलायची आणि त्याला गुजरातची पावती दाखवून ती जिल्ह्यात बिंधास्तपणेर वैकायची असा उद्योग पोलीस आणि महसूलच्या आशीर्वादाने सध्या जोरात सुरु आहे. विशेष म्हणजे केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांच्या तापसातूनच ही बाब समोर आली आहे.
बीड जिल्ह्यात वाळूवर मोठ्याप्रमाणावर अर्थकारण चालत आलेले आहे. वाळू माफियांनी पोलीस आणि महसूलच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास गोदावरी पात्राची चाळणी केलि असून वाळूचे भाव देखीलमोठ्या प्रमाणावर वाढविले आहेत. जिल्ह्यात पावसाळ्यात वाळू वाहतुकीला आणि उपशाला बंदी होती, त्यावर वाळू माफियांनी युक्ती शोधली आहे. बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या, विशेषतः गेवराई तालुक्यातील नदीपात्रांमधून वाळू उपसा करायचा आणि वाहनासोबत पावती मात्र गुजरातमधून खरेदी केल्याची जोडायची असा हा अफलातून फंडा आहे. विशेष म्हणजे ही पावती सुद्धा चुकून कोणी वाहन पकडलेच तर केवळ दाखवायला असते.
याचा अनुभव चक्क केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांचं आला आहे. काही दिवसांपूर्वी कुमावत यांच्या पथकाने केज उपविभागाचे हद्दीत एक वाळूचे वाहन पकडले होते, त्याने वाळू कोठून आणली याचा शोध घेत कुमावत यांचे पथक चक्क गेवराई तालुक्यातील गोदापात्रात देखील पोहचले होते. त्याठिकाणी सुरु असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत कुमावत यांनी प्रशासनाला वेगळे पत्र देखील दिले.
मात्र या प्रकरणाच्या तपासादरम्यान, जे वाहन पकडण्यात आले होते , त्या वाहनाच्या मालकाने चक्क गुजरात राज्यामधून वाळू खरेदी केल्याची पावतीच पोलिसांना सादर केली, त्याचवेळी वाहनाच्या चालकाची पोलिसांनी 'विचारपूस ' केल्यानंतर चालकाने मात्र आपण ही वाळू गेवराई तालुक्यातील नदीपातरतून भरल्याची माहिती पोलिसांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. या साऱ्या प्रकारानंतर या वाळूची तपासणी व्हावी असे पत्रही उपविभागीय पोलीस अधिकारी कुमावत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे, मात्र यासंर्भात प्रशासन डोळ्यावर कातडे ओढून बसले आहे. वाळू माफ़िया मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाळूला सोन्याच्या भावात विकीत आहेत.