नवी दिल्ली - टीव्ही उत्पादन क्षेत्रात भारत पूर्णपणे आत्मनिर्भर व्हावा याकरिता केंद्र सरकारने टीव्हीच्या ओपन सेल या सुट्या भागावर पुन्हा पाच टक्के सीमा शुल्क लावले आहे. त्यामुळे भारतातील टीव्ही महाग होतील, असा दावा टीव्ही उत्पादकांच्या संघटनेने केला आहे.कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष कमाल नंदी यांनी सांगितले की, सरकारने हा उद्योग अडचणीत असताना अचानक ओपन सेलवरील सीमाशुल्क पाच टक्के केले आहे. या अगोदर एक वर्ष हे शुल्क रद्द करण्यात आले होते. एकूण टीव्ही उत्पादनामध्ये ओपन सेलचा भाग 65 टक्के असतो. ओपन सेल भारतात तयार करण्यासाठी प्रचंड गुंतवणूक आणि वेळ लागतो. अचानक ओपन सेल आयात बंद केल्यास भारतातील टीव्ही उत्पादनावर परिणाम होईल.त्याचबरोबर पाच टक्के महाग ओपन सेल आयात केल्या नंतर टीव्ही उत्पादनाचा खर्च वाढेल. त्याचा ग्राहकांना त्रास होईल. हा उद्योग अगोदरच अडचणीत असताना केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे, तो शक्य झाल्यास परत घेण्याची गरज असल्याचे नंदी यांनी सूचित केले. अन्यथा ग्राहक टीव्ही घेण्याकडे दुर्लक्ष करण्याची शक्यत आहे.