आष्टी-गेल्या चार वर्षांपासून कापसावर पडणाऱ्या बोंडआळीचा प्रादुर्भाव ,अतिवृष्टी,शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे वाढलेला कल यामुळे दिवसेंदिवस कापसाचा पेरा कमी होत असल्याने आवक कमी झाली.त्यामुळे या वर्षी कापसाला उच्चांकी दर मिळत असून सुरुवातीलाच हमीभावाचा टप्पाही पांढऱ्या सोन्याने 'सर' केला आहे. यंदा प्रथमच कापसाला प्रति क्विंटल आठ हजार पाचशे भाव मिळत आहे.
कापसाला मागील काही वर्षात ४५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळत होता. त्यामुळेच सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल अधिक राहात होता, कारण केंद्र सरकारने कापसाला ६ हजार ५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु यंदा केंद्राच्या या हमीभावापेक्षा बाजारात ८५०० रुपये प्रतिक्विंटलने कापसाची खरेदी खासगी व्यापाऱ्यांकडून होत आहे.
कापूस वेचणीचा खर्चही वाढला असून लागवड खर्चातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाही कापसाचा उत्पादन खर्चही भरून निघेल की नाही, या विवंचनेत शेतकरी सापडला होता. अशातच दिवाळी तोंडावर असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. यादरम्यान जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जिनिंगकडून खरेदी सुरू करणे सुरू झाले असून लांब धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल ८५०० रुपयांच्यावर भाव मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. यावर्षी वाढत्या महागाईमुळे तर शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून उत्पादनातही मोठी घट झाली आहे. सुरुवातीस कापसावर बोंडअळीचा झालेला प्रादुर्भाव व अतिपावसामुळे कपाशीची बोंडे काळी पडून नुकसान झाले आहे. यंदा कापसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून उत्पन्न मात्र अर्ध्यावर आहे. परंतु यंदा कापसाला मिळत असलेला भाव पाहता झालेल्या नुकसानीपासून काहीसा दिलासा नक्कीच शेतकऱ्यांना मिळत आहे. दिवाळीचा सण तोंडावर असून कापसाच्या वाढलेल्या भावामुळे दिवाळी काही प्रमाणात गोड होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
बातमी शेअर करा