मुंबई-आयपीएलच्या पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंगने मुंबई इंडियन्सच्या संघाचे पानिपत करत विजयी सलामी दिली.पहिल्या लढतीत चेन्नईने पाच गडी राखत १६३ धावांचे आव्हान पेलले.ड्यु प्लेसिस आणि अंबाती रायडूने शतकी भागीदारी करून चेन्नईला विजय मिळवून दिला.धोनी नाबाद ० वर राहिला.
गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या तेराव्या सीजनची विजयी सुरुवात केली आहे. चेन्नईने मुंबईवर पाच विकेट्ने मात केली. चेन्नईच्या विजयात अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिसने महत्त्वाची कामगिरी बजावली. चेन्नईची सुरुवात खराब झाली. मुरली विजय आणि शेन वॉटसन पहिल्या दोन षटकातच स्वस्तात माघारी फिरले.
त्यानंतर मैदानात उतरलेल्या अंबाती रायडू आणि फाफ डू प्लेसिसने डाव सावरला. अंबाती रायडूने सर्वाधिक 71 धावा केल्या तर फाफ डू प्लेसिस 58 धावा करत त्याला साथ दिली. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, पॅटिनसन, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, राहुल चहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
मुंबईच्या संघाने दणकेबाज सुरूवात केली होती, पण धोनीच्या अनुभवी नेतृत्वाने पुन्हा एकदा चेन्नईला तारलं. दमदार सुरूवात मिळालेल्या डी कॉकला ३३ धावांत तर दीर्घकाळाने संधी मिळालेल्या सौरभ तिवारीला ४२ धावांवर रोखण्यात चेन्नईचे गोलंदाज यशस्वी ठरले. रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, हार्दिक आणि कृणाल पांड्या या खेळाडूंना मात्र आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे सुरूवातीला मुंबईचा संघ १८०पार सहज मजल मारेल असं वाटत असताना प्रत्यक्षात मात्र त्यांना १६२ धावाच करता आल्या. लुंगी एन्गिडीने सर्वाधिक ३, तर दीपक चहर आणि रविंद्र जाडेजाने २-२ बळी टिपले.