Advertisement

बीडमध्ये  बस चालकाची आत्महत्या

प्रजापत्र | Tuesday, 12/10/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१२ अॉक्टोंबर – नाशिक, लातूर व धुळ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर आता बीडमध्येही एका बस चालकाने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. मार्च २०२० पासून जवळपास २४ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या  केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

 
कोरोना आपत्तीमुळे पगार वेळेवर होत नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. याच कारणामुळे नाशिक येथे बस  मध्ये चालकाने आत्महत्या केली होती. या पाठोपाठ लातूरमध्येही बसमध्ये चालकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्ये देखील बसचालकाने  राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

 

तुकाराम त्रिंबक सानप रा. अंकुश नगर बीड (वय ४२) वर्ष असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. तुकाराम सानप हे आर्थिक संकटात सापडले होते. गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्या घराचा वीज पुरवठा बील न भरल्यामुळे खंडित करण्यात आला होता. सोमवारी सानप यांनी आपली ड्युटी प्रामाणिक पणाने पार पाडली. ड्युटी संपून घरी गेल्यानंतर त्यांनी अंकुश नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत सानप यांना एक चार वर्षाचा व एक सहा वर्षाचा असे दोन मुले आहेत.

 

वर्षभरात २४ कर्मचाऱ्यांची आत्महत्या.
राज्यामध्ये एसटीची अवस्था ही अतिशय बिकट झालेली असून, कमी वेतन व आर्थिक समस्यांमुळे एसटी कर्मचारी चांगलाच हवालदिल झालेला आहे. राज्यामध्ये कोरोना कालखंडामध्ये म्हणजेच मार्च २०२० पासून ते आत्तापर्यंत २४ एसटी कर्मचाऱ्यानी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. यामध्ये 14 चालक असून, वाहक तसेच इतर विभागातील कर्मचारी आहेत. टाळेबंदीनंतर एसटी कर्मचारी कोलमडला. एसटीच्या उत्पन्नावरही टाळेबंदीचा खूप मोठा परिणाम झालेला आहे. शिवाय एसटीचे वेतनही वेळेवर नसल्यामुळे, एसटी कर्मचारी वैतागले आहेत.

Advertisement

Advertisement