बीड :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सर्वांनाच या दोघांच्या कामांचा सपाटा पाहायला मिळाला. दोनही मंत्री महोदयांचा आज सकाळी ९ वाजता सुरू झालेला दिवस पहाटे ३.००वाजता संपला!
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उभय मंत्री महोदयांनी चक्क रात्री 10.30 वा. जलसंपदा विभागाची बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यातील जलप्रकल्प, त्यांची सुरू किंवा प्रस्तावित असलेली दुरुस्ती व अन्य कामे यांसह नवीन प्रस्तावित केलेली कामे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मागण्या आदी बाबींवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांचे आभार मानले.
अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी व आढावा
बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. मंत्री जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तर धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागात सुरू मदत कार्याचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आढावा घेतला व पूर पीडितांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
कार्यकर्त्यांशी संवाद आणि विभागाचा आढावा
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटील राज्यभर पक्षाचा आढावा घेत आहे. याच यात्रेच्या निमित्ताने ते आज बीड जिल्ह्यात होते. पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना त्यांनी बीड जिल्ह्याच्या कार्यकारिणीचा तसेच केज , बीड या मतदारसंघांचाही धनंजय मुंडे यांच्या समवेत आढावाही घेतला. परभणी जिल्हयातील गंगाखेड चाही त्यांनी आढावा घेतला.
कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी देत त्यांनाही दिले बळ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेले तीन वर्षांपासून पक्षाशी प्रत्येक माणूस जोडत आहे. त्याअनुषंगाने आज बीड व परभणी जिल्ह्यात असताना त्यांनी आ. संदीप क्षीरसागर, डॉ. मधूसूदन केंद्रे, डॉ. नरेंद्र काळे, ऍड तोतला, उषाताई दराडे, डॉ. पंडित, ठोसर आदि प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी गाठीभेटी घेत त्यांना बळ दिले. हे सत्र अगदी बुधवारी पहाटे उशिरापर्यंत सुरू होते.