Advertisement

आर्मीतील अधिकारी असल्याची बतावणी करून अंबाजोगाईतील व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

प्रजापत्र | Saturday, 11/09/2021
बातमी शेअर करा

 

 
 

अंबाजोगाई : आर्मीच्या अधिकारी असल्याची बतावणी करुन मोबाईलवर संपर्क साधलेल्या एका भामट्याने अंबाजोगाई येथे कॅम्प होणार असून त्यासाठी १५ व्यवसायीक गॅस कनेक्शन हवे आहेत. त्यासाठी रक्कम ऑनलाईन पाठवा. आमच्या हेड ऑफिसवरुन ते रिफंड होतील अशी थाप मारुन शहरातील गॅस विक्रेत्याकडून तब्बल १ लाख ३५ हजार ४१५ रुपयाची रक्कम अनोळखी भामट्यांनी लंपास केली. याप्रकरणी आता शहर ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे.

 

 

जिल्ह्यात सध्या ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वेगाने वाढत चालले आहेत. कधी अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे सांगत तर कधी ओटीपी विचारुन घेत नागरिकांच्या बँक खात्यातून लाखोंच्या रकमा ऑनलाईन लांबवल्या जात आहेत. अशा चोरट्यांचा यंत्रणेलाही तपास लागणे आव्हानात्मक ठरू लागले आहे. असाच एक प्रकार अंबाजोगाईत समोर आला आहे. शहरातील अभय संजय पवार हे खासगी गॅस एजन्सी चालवतात. ८ सप्टेंबर रोजी त्यांना २ अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला. ‘मी आर्मीमधून बोलतोय, आमचा अंबाजोगाई येथे कॅम्प होणार आहे. त्यासाठी आम्हाला १५ व्यवसायीक गॅस कनेक्शन पाहिजेत. त्याचे पैसे आमच्या हेड ऑफीसवरुन रिफंड होतील असे फोनवरुन बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीने पवार यांना सांगितले. त्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवून पवार यांनी त्या व्यक्तीला ९  हजार रुपयाची रक्कम पाठवली. त्यानंतरही संबंधीताने ऑनलाईन चालू आहे असे सांगत वेळोवेळी असे एकुण १ लाख ३५ हजार ४१५ रुपये पाठवण्यास भाग पाडले. ही रक्कम पाठवल्यानंतर पवार यांना कसलाही रिफंड मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १० सप्टेंबर रोजी शहर ठाण्यात फिर्याद नोंदवली. यावरुन अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. पो.नि.पवार अधिक तपास करत आहेत.

 

 

Advertisement

Advertisement