Advertisement

सैन्यभरतीसाठी बनावट शालेय दाखला देणाऱ्या टोळीत बीड जिल्ह्यातील दोघांचा समावेश

प्रजापत्र | Saturday, 11/09/2021
बातमी शेअर करा

बीड : नगर जिल्ह्यात सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या मुलांना शाळा, महाविद्यालयांचे बनावट दाखले देणाऱ्या टोळीचा नाशिक व नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दरम्यान, या टोळीचे बीड कनेक्शनही समोर आले असून यात बीडच्या दोघांचा समावेश आहे. शिरुर तालुक्यातील एका महाविद्यालयाच्या नावानेही बनावट टीसी दिल्याचे समोर आले आहे.

 सैन्य भरती  व इतर शासकीय नोकऱ्यांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना  शाळा सोडल्याचा बनावट दाखला (टीसी) तयार करुन देणारी टोळी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कार्यरत होती. नाशीक पोलिसांना या प्रकरणाचे काही धागेदोरे हाती लागले होते. नाशीक व नगर पोलिसांनी गुरुवारी डमी व्यक्ती पाठवून खातरजमा करुन कारवाई करुन मारुती आनंदराव शिरसाठ (रा. जांभळी जि.नगर) आणि दत्तू नवनाथ गर्जे (रा. अकोले जि.नगर) यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, त्यांनी साथीदारांच्या नावांची माहिती दिली असून बीड जिल्ह्यातील कुंडलीक दगडू जायभाये (रा. अनपटवाडी ता. पाटोदा) आणि मच्छिंद्र कदम (रा. मानूर ता. शिरुर) या दोघांदचाही टोळीत समावेश आहे. शिवाय, अजय राजाराम टिळे (वाडीवारे जि. नाशीक) आणि शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा. पिंपळगाव जि. नाशीक) यांचीही नावे समोर आली आहेत. अद्याप चौघेही फरार आहेत. 

 
दरम्यान, या टोळीकडे अनेक शाळा महाविद्यालयांचे दाखला पुस्तक, शिक्के आढळून आले आहेत. यामध्ये  बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथील संत भगवानबाबा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या शिक्क्यांचाही समावेश आहे. या महाविद्यालयाच्या नावेही बनावट दाखले वाटप केले गेले आहेत. 

 

२ हजारांत दाखला

दरम्यान, ही टोळी अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये बनावट दाखला तयार करुन देत असल्याचेही पोलिस चौकशीत समाेर आले आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी विनोद शिवाजी मासाळकर यांच्या तक्रारीवरुन पाथर्डी (जि.नगर) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Advertisement

Advertisement