धारूर दि.६ सप्टेंबर - धारुर तालुक्यातील बहुचर्चित आरणवाडी साठवण तलावाच्या विहिरीच्या भागाकडील भिंत खचल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे तलाव फुटण्याची भिती निर्माण झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाचा फटका येथील आरणवाडी साठवण तलावाला बसला आहे. गेली अनेक दिवस हा तलाव या ना त्या कारणाने चर्चेत आहे. सांडवा फोडल्यामुळे चर्चेत आलेल्या या तलावावर सध्या संकट ओढावले आहे. तलावाचे काम तब्बल १७ वर्षापूर्वी सुरु होवून ठप्प पडले होते.
या तलावाच्या पश्चिमेस असलेल्या विहिरीकडील भिंतीवरील पिचिंग खचल्याचे निदर्शनास आले आहे. पाटबंधारे खात्याचे अधिकारी व कर्मचारी तलावावर लक्ष देवून आहेत. तलाव फुटीपासून बचाव करण्यासाठी सांडवा फोडणे अथवा इतर मार्गाचा उपाय शोधला जात आहे. मात्र तलाव फुटण्यामुळे तलावाखालील चोरांबा, पारगाव, थेटेगव्हाण आदी गावांना धोका निर्माण झाला आहे.