माजलगावचे डक कुटुंब म्हणजे शरद पवारांच्या अत्यंत विश्वासतले. अगदी दिवंगत नेते माजी आ.गोविंदराव डक यांच्यापासून ते आता अशोक डक यांच्यापर्यंत. या कुटुंबातील अशोक डक यांना मुंबई बाजारसमितीच्या सभापती पदाची संधी मिळाली आहे. बीड जिल्ह्यात मुंबई बाजारसमितीचं सभापती पद अशोक डक यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच आले आहे. या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद
प्रश्न- मुंबई बाजार समितीचे सभापती पद आपल्याला मिळेल असे वाटत होते का?
अशोक डक- सर्व प्रथम ज्यांनी मला हे पद दिले ते आमचे नेते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजीत पवार, शशीकांत शिंदे या ज्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला एका शेतकर्याच्या पोराला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सभापती पद हा नंतरचा विषय होता. अगदी सुरूवातीला मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीत मला औरंगाबाद महसूल विभागातून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली याचाच मोठा आनंद होता. मी लहानपणापासून हाडाचा कार्यकर्ता आहे. विविध चळवळींमध्ये काम केले आहे. त्यामुळे या मतदार संघात माझ्या मित्रांचं जाळं फार मोठं आहे त्याच्याच आधारावर हा मतदार संघ पिंजून काढला आणि निवडणूकीत सर्वाधिक मतांनी निवडून आलो. निवडणूका झाल्यानंतर कोरोना सुरू झाला त्यामुळे सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या पण या काळात मनातून वाटायचं की शरद पवार आपल्याला न्याय देतील आणि त्यांनी तो न्याय दिला.
प्रश्न-मुंबई बाजार समितीची व्याप्ती काय आहे.
अशोक डक-1977 ला या बाजार समितीची स्थापना झाली. या बाजार समितीत देशभरातून फळे, फुले, मसाले, कडधान्य, अन्नधान्य, भाजीपाला येतो. बाजार समितीचे पाच मोठे मार्केट आहे. आशिया खंडातलं हे सर्वात मोठं मार्केट आहे. शेतकरी आणि व्यापारी या सर्वांसाठीच ही बाजार समिती खूप मोठी आहे. आणि माझ्या राजकारणात कायम शेतकरी केेंद्रस्थानी राहिलेलं आहे.
प्रश्न-आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात कशी झाली?
अशोक डक-1990 ला मी अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यावेळी माजलगावमध्ये वीजेची समस्या फार मोठी होते. 33 केवी उपकेंद्र कमी होते. डीप्या कमी होत्या. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत नसायचा. यासाठी मी त्यावेळी बैलगाडी मोर्चा काढला. 400-500 बैलगाड्यांचा मोठा मोर्चा निघाला याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली. पुढच्या वर्षभरात अनेक कामे पूर्ण झाली आणि त्यातूनच आपण लोकांमध्ये आहोत, लोकांचा आपल्यावर विश्वास आहे. आपण या क्षेत्रात टिकू शकतो याची जाणीव झाली तीच राजकारणाची सुरूवात होती.
प्रश्न-आपल्या राजकारणावर कोणाचा प्रभाव आहे?
अशोक डक-अर्थातच माझे वडील दिवंगत माजी आमदार गोविंदराव डक यांचा. ते माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे कार्यकर्ते होते. मी लहानपणापासूनच त्यांचे काम पहात होतो. माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही तसे राजकारणाचे बाळकडू मला तिथेच मिळाले. 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही डक कुटुंबाची मतदार संघात ओळख आहे.
प्रश्न-आपलं शिक्षण कोठे झाले?
अशोक डक-माझे शिक्षण औरंगाबाद, मद्रास आणि पुणे या ठिकाणी झाले.
प्रश्न-एवढ्या मोठ्या शहरांमध्ये शिकलेला तरूण स्वत:ला खेड्यांशी कसाकाय जोडू शकला?
अशोक डक-शिक्षणासाठी मी हॉस्टेलवर रहायचो. त्याठिकाणी सर्व जाती धर्माचे, वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले मित्र मिळत गेले. शिकत असताना मी बास्केट बॉलचा खेळाडू होतो. त्यातून टीम वर्क आणि खिलाडू वृत्ती कळाली. पुढे अपक्ष निवडणूक लढवताना टीम वर्क आणि संघटनाचं महत्व कळालं. गावी आल्यानंतर आमच्या कुटुंबाची नाळ पहिल्यापासूनच शेतकर्यांशी जोडली गेली होती त्यामुळे या वातावरणात मी स्वत:ला सहज जोडू शकलो.
प्रश्न-जिल्हा परिषदेच्या राजकारणातही आपला एक वेगळा ठसा आहे. एक मोठं सत्तांतर आपण घडवून आणलं तो प्रसंग काय होता?
अशोक डक-त्यावेळी मी भाजपकडून जिल्हा परिषदेचा सदस्य झालो होतो. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने शेवटच्या क्षणी मी भाजपची उमेदवारी घेतली होती. त्यावेळी दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा राज्यावर दबदबा होता. बीड जिल्हा हा तर त्यांचा स्वत:चा जिल्हा. त्यावेळी सुरेश धस भाजपचे आमदार होते. रमेश आडसकर काँग्रेसचे होते. त्या जिल्हा परिषदेत गोपीनाथ रावांनी 60 पैकी 43 सदस्य मिळवीले होते. जसं की मी सांगितलं मी शेवटच्या क्षणी भाजपची उमेदवारी घेतली होती. पण आमची नाळ शरद पवारांशी, पवार कुटुंबांशी जोडली होती. मी शरद पवारांना कधी भेटता येईल याची संधी शोधत होतो. त्या परिस्थितीत सुरेश धस यांच्या माध्यमातून माझी आणि अजीत पवारांची बारामतीत भेट झाली. मुळ घरी आल्याचा आनंद झाला. त्याचवेळी सत्तांतर होत असेल तर मी सोबत आहे हा शब्द मी दिला आणि तो पाळला देखील.
प्रश्न- या सत्तांतरात महत्वाची भूमिका असतानाही आपल्याला कोणतंच पद कसं मिळालं नाही?
अशोक डक-त्या सत्तांतरासाठी बर्याच स्थानिक तडजोडी कराव्या लागल्या होत्या त्या मीच घडवून आणत होतो. आता आपण स्वत:च्या पदाचा हट्ट केला तर सत्ता येणार नाही हे मला जाणवत होतं. अजीत पवरांची मला पद देण्याची तीव्र इच्छा होती पण मीच त्यांना नको असं सांगितलं. त्यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी मला महामंडळावर घेण्याचा शब्द दिला होता.
प्रश्न-राष्ट्रवादी न्याय देईल या विश्वासामागचं कारण काय?
अशोक डक-मी लहानपणापासून पवार कुटुंबाशी जोडलेला आहे. आणि हेच कुटुंब सामान्यांना न्याय देऊ शकतं हा विश्वास आहे. तो विश्वास सार्थ होता हे आता सर्वांनाच कळलं असेल.
प्रश्न-आपण प्रदीर्घ काळ राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष होता तो अनुभव कसा राहिला?
अशोक डक-मी तब्बल सव्वा नऊ वर्ष राष्ट्रवादीचा जिल्हाअध्यक्ष होतो. ज्या काळात हे पद एक दीड वर्ष टिकवणंही इतरांना औघड होतं त्या काळात इतका प्रदीर्घ काळ पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली. मी देखील सहाही मतदार संघातील नेत्यांशी समन्वय साधत त्यांच्या अडचणी, पक्षासमोरचे प्रश्न वरिष्ठांना कळवत होतो. एक चांगला अनुभव त्या माध्यमातून आला. बीडमध्ये राष्ट्रवादीचं एक भव्य कार्यालय माझ्याच काळात उभारता आलं.
प्रश्न-जिल्हा परिषदेच्या राजकारणात राहिलेले आपण थेट बाजारसमितीत उतरलात ही राजकीय खेळी काय होती?
अशोक डक-राजकारणात कोणतंच पद लहान मोठं नसतं. पक्षाचं जिल्हाअध्यक्ष पद सांभाळल्या नंतर अजीत दादांनी माझी आणि प्रकाश दादांची बैठक घडवून आणली. आमच्या मध्ये थोड्या राजकीय नाराज्या होत्या. त्यावेळी अजीत पवारांनी आपल्यात समन्वय नसल्याने माजलगावची जागा गमवावी लागली हे सांगून हे सर्व मिटवा एकत्र काम करा असं सांगितलं. यासाठी कोण काय करू शकतो याची विचारणा केली. त्यावेळी प्रकाश दादांनी मी माझ्यापासून सुरूवात करतो. आता बाजार समितीच्या निवडणूका लागल्या आहेत. तिथे अशोक डकांना संधी देऊ अशी भूमिका घेतली. मी अगदी सुरूवातीपासून मुंबई बाजारसमितीवर संचालक होण्यासाठीच माजलगाव बाजारसमितीची निवडणूक लढवत आलो होतो त्यामुळे हा प्रस्ताव मी स्वीकारला.
प्रश्न-माजलगाव समितीत असताना वेगळं काय केलं?
अशोक डक-शेतकर्यांसाठी राज्यात कोठेच नाही असा एक रूपयात जेवणाचा प्रकल्प मी राबविला. त्यासोबतच मागच्याच हंगामात कापसाचा प्रश्न जटील बनल्यानंतर तब्बल नऊ कापूस केंद्रे आम्ही सुरू केली अशा अनेक गोष्टी करता आल्या.
प्रश्न-अशोक डकांना अनेक पदांनी जवळून हुलकावणी दिली त्यावेळी काय वाटायचं?
अशोक डक-मी 20 वर्षापासून राजकारणात आहे त्यामुळे बर्याचदा एखादं पद आपल्याला मिळेल असे वाटत असताना ते दूर गेले. जिल्हा परिषदेतील सभापती पद असेल किंवा विधानसभेची उमेदवारी. स्थानिक राजकीय तडजोडींमुळे ही पदं मला मिळू शकली नाही पण त्या प्रत्येक वेळी पवारांच्या मनात आल्याबरोबर संधी मिळतेच हा विश्वास होताच.
प्रश्न-आपण राजकारणात नसता तर काय झाला असता?
अशोक डक-मी राजकारणात नसतो तर चांगला उद्योजक झालो असतो. मी लहानपणापासून वेगवेगळे उद्योग केले आहेत. आताही माझ्या पुण्यात हॉटेल आहेत. मुळातच वडिलांचा राजकीय वारसा माझे मोठे बंधू चालवायचे. आम्ही चार भाऊ त्यामुळे सर्वांनाच राजकारणात येता येणार नव्हते पण मोठ्या बंधूंना धुळीची अॅलर्जी झाल्याने त्यांना लोकसंपर्कात मर्यादा येऊ लागल्या आणि म्हणून मी राजकारणात वळू लागलो.
प्रश्न-राजकारणापलिकडचे आपले छंद काय आहेत?
अशोक डक-मला शेतीचं ज्ञान नाही पण मला शेती आवडते. म्हणजे कोणी एखादी नवीन संकल्पना सांगितली की मी त्याची नोंद घेतो. माझी पत्नी शेती पाहते. मी अशा कोणत्याही संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्याची अंमलबजावणी करून घेतात. तसेच मी निसर्गप्रेमी आहे. शेतातल्या घरावर जाऊन जेवण करणं किंवा वर्षातून एकदा कुटुंबासह एखाद्या पर्यटन स्थळी जाणं मला आवडतं.
प्रश्न-मुंबई बाजार समितीच्या माध्यमातून काय करायचं आहे?
अशोक डक-मुंबई बाजार समिती ही शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधला दुवा आहे. माझ्या कार्यकाळात एक वेगळा ठसा उमटेल असं काम करायचं आहे.
प्रश्न-राजकारणात अपेक्षा काय आहेत?
अशोक डक-राजकारणात अपेक्षा म्हणण्यापेक्षा जेथून शेतकर्यांचे हीत साधता येईल अशा पदावर काम करण्याची संधी मिळावी इतकीच अपेक्षा आहे.