बीड -मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे धारूर तालुक्यातील आरणवाडी साठवण तलाव ओसंडून वाहू लागला आहे. काही दिवसांपूर्वी साठवण तलावाचा सांडवा फोडण्यात आल्याने ग्रामस्थांनी मोठे जनआंदोलन उभारले होते. जन रेट्यामुळे सांडवा पुन्हा पूर्ववत करण्यात आला. यानंतर झालेल्या पावसामुळे तलाव पूर्णक्षमतेने भरला आहे. मंगळवारी रात्री सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचे दृष्य पाहून पाच गावच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे आरणवाडी तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता. या प्रकारानंतर तलावाखालील आरणवाडी, चोंराबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी या गावातील ग्रामस्थांनी जन आंदोलन उभारले. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन दहाच दिवसात सांडवा पूर्ववत बांधण्यात आला. दरम्यान, मागील चार दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे आरणवाडी साठवण तलावात पाण्याची मोठ्याप्रमाणात आवक झाली. यामुळे मंगळवारी रात्री तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. हे दृष्य पाहून पाचही गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जोरदार पावसामुळे रात्री चोरंबा-चारदरी रस्त्यावरील पुलावरून तब्बल सात फूट पाणी वाहत होते.
पाच गावात हरीत क्रांती होणार
या तलावामुळे अनेक वर्षाचे स्वप्न डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे पूर्ण झाले आहे. सांडवा फोडल्याने स्वप्न उधळली होती. जनरेट्यामुळे अधिकारशाही झुकली व सांडवा पूर्ववत झाला. यानंतर आता तलाव पूर्ण भरल्याने डोंगरात हरीतक्रांती करण्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे.