Advertisement

मराठा,ओबीसींचे आरक्षण मिळाल्याशिवाय हार,फेटा बांधणार नाही

प्रजापत्र | Monday, 16/08/2021
बातमी शेअर करा

बीड-मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय हार तर ओबीसींचे आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा निर्धार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सोमवारी (दि.१६) केला.राज्यात भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, येणारा  काळ निवडणुकीचा आहे. स्वतःसाठी नाही तर पक्षासाठी वज्रमुठ करा. मेहनत घ्या,संघटन मजबूत करा व निष्ठा ढळू न देता उत्तम काम करा असा कानमंत्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना दिला.

         माँ वैष्णो पॅलेस येथे भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठक आणि समर्थ बूथ अभियानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी खा. डाॅ. प्रितम मुंडे,  संघटन मंत्री भाऊराव देशमुख,जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,आ.सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, आ.नमिता मुंदडा, आर. टी. देशमुख, रमेश आडसकर, माजी आमदार आदिनाथ नवले, केशवराव आंधळे, मोहन जगताप, उषाताई मुंडे आदी उपस्थित होते. 
पंकजा मुंडे म्हणाल्या,बीड जिल्हा हा गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला आहे,अनेक निवडणुकीत विजय मिळवून आपण ताकद सिद्ध केली आहे. मंत्रीपदाच्या काळात विकासाची कामे करताना जात-पात, धर्म पाहिला नाही, माणूस पाहिला. मायेच्या भावनेतून सर्वांना स्वतःपेक्षाही जास्त जपले. मी शांत आहे पण याचा अर्थ चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही.आज आपण राज्यात विरोधकाच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे संघटन मजबूत करा. सध्याचा काळ संघर्षाचा असला तरी जनतेशी चांगला संपर्क ठेवून त्यांची कामे करा. येणारा काळ हा निवडणूकांचा आहे, त्यामुळे स्वतःसाठी नाही तर पक्षाच्या विजयासाठी वज्रमुठ तयार करा असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

माझ्या विरोधात अपप्रचार
माझा लढा वंचितासाठी आहे. मराठा-ओबीसी आरक्षणा बरोबरच एससी, एसटी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय देखील ऐरणीवर आहे. मराठा आरक्षणाच्या विषयात विरोधक माझ्या विरोधात अपप्रचार करतात, परंतु आपली भूमिका स्पष्ट आहे. मराठा  आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय हार तर ओबीसींचे आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा निश्चय पंकजा मुंडे यांनी यावेळी जाहीर केला.

Advertisement

Advertisement