बीड- 'राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो'. दिवंगत भाजपनेते गोपीनाथ मुंडेंनी सांगितलेलं हे राजकीय यशाचं सूत्र. हेच सूत्र आता त्यांच्याच तालमीतले कार्यकर्ते वापरताना दिसत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंना भलेही राज्यातील फडणवीसांसारख्या नेत्यांचे वावडे असेल, पण त्यांच्याच बीड जिल्ह्यातील कार्यकर्ते आता फडणवीसांच्या प्रेमात पडत आहेत. भाजपच्या किसान आघाडीचे प्रदेश पदाधिकारी असलेल्या रमेश पोकळेंनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट जिल्ह्यातील बदलत्या राजकारणाचे संकेत तर नाहीत ना?
बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्य भाजपावर एकेकाळी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचेच वर्चस्व होते. ते इतके की त्यांना विचारल्याशिवाय भाजपचे कोणतेच नेते बीड जिल्ह्यात कार्यक्रमाला देखील येत नसायचे. पुढे त्यांच्या वारसदार असलेल्या पंकजा मुंडेंना भाजपने, त्यातही देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा अडचणीत आणले, त्यामुळे बीड जिल्हा भाजपला फडणवीसांबद्दल फारसे प्रेम कधीच नव्हते. अगदी त्यावेळी आ. मेटेंसोबत असलेल्या राजेंद्र मस्केंनी छावणीवर सामुहिक विवाह ठेवला, त्याला उपस्थित राहिलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला जिल्ह्यातील भाजपचा एकही पदाधिकारी गेला नव्हता. महाजनादेश यात्रेत बीडच्या विश्रामगृहात झालेले मानापमान नाटय देखील बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना फडणवीसांबद्दल किती प्रेम आहे , हे दाखविणारे होते.
मात्र मागच्या काही काळात जिल्ह्यातील परिस्थिती देखील बदलत आहे. विधानपरिषदेचे सदस्य असलेल्या आ. सुरेश धस यांनी कांही दिवसांपुर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आष्टीत रुग्णवाहिकांच्या लोकार्पणातून साजरा केला होता. तर आता एकेकाळी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे आघाडीचे सैनिक राहिलेल्या रमेश पोकळेंनी देवेंद्र फडणवीसांसाठी फेसबुक पोस्ट केली आहे. देवेंद्र फडणवीसांचे पूरग्रस्त भागातील काम कसे चांगले आहे हे सांगणारी पोकळेंची पोस्ट भाजपच्या बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना देखील नागपूर खुणावत असल्याचेच द्योतक आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर बीड जिल्ह्यात भाजपेयींचे राजीनामा सत्र सुरु असताना रमेश पोकळेंनी दिल्लीत जावून केंद्रीय मंत्री श्री.दानवे, श्री.कराडांना शुभेच्छा दिल्या होत्या हे ही विसरता येणार नाही. तसेच देवेंद्र फडणवीसांचे नाव हातावर कोरणाऱ्या नरेंद्र पाटलांचा चाहता वर्ग देखील बीड जिल्ह्यात वाढतोय, बाकी भाजपचे आमदार आणि शिवसंग्रामचे संस्थापक असलेल्या विनायक मेटेंची फडणवीसांशी असलेली मैत्री देखील बीडकरांना नागपूरसाठी दिशादर्शक ठरत असल्यास त्यात नवल नाही.
हेही वाचा ...
सासऱ्याने फोडले सुनेचे डोके
http://prajapatra.com/2830