बीड : कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईतच लॉक झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय कधी होणार या बाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. त्या उत्सुकतेचे उत्तर स्वत: पंकजा मुंडे यांनीच दिले आहे. गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना शुभेच्छा देताना पंकजा मुंडे यांनी ‘जनतेपासून कोणीच फार काळ दुर राहू शकत नसते, मी सुध्दा राहू शकत नाही, जनतेच्या स्वास्थ्यासाठी आणि प्रशासनातील काही नियमांमुळे तुमच्यामध्ये येता आले नाही. मात्र पुन्हा पहिल्याच ताकतीने, माझा झंजावात येणार आहे’ असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मात्र हे लगेच होणार नाही तर त्यासाठी किती दिवस वाट पहावी लागेल याचा खुलासाही पंकजा मुंडे यांनी केला आहे.
पंकजा मुंडे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेला शुभेच्छा देताना स्वत:च्या पुनरागमनाची घोषणा केली मात्र त्यासाठी वेळ लागणार असल्याचेही सांगितले आहे. ‘माझा मुलगा आर्यमान उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. त्याच्या सोबत मी देखील तिथे जाणार आहे. त्यानंतरचा क्वारंटाईन कालावधी आणि परदेशात आर्यमानला स्थिर स्थावर केल्यानंतर मी परतणार आहे. आतापर्यंत त्याच्या आयुष्यातील सगळे क्षण मी समाजाला दिले आता समाजाचे काही क्षण मी आर्यमानसाठी देणार आहे. कारण नेता असतानाच मी माता सुध्दा आहे’ असे भावनिक वक्तव्य करुन आर्यमानला परदेशात स्थिर केल्यानंतर मी पुन्हा जनतेच्या भेटीसाठी, जनतेच्या सेवेत त्याच ताकतीने येणार असल्याचे पंकजांनी स्पष्ट केले आहे.
बातमी शेअर करा