बीड : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी शासनाने ३१ जुलैच्या मुदत दिली असून त्यानंतर १४ ऑगस्टपर्यंत विशेष बदल्या होणार आहेत. त्यामुळे राज्यभरात सध्या सर्वच कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत . शिक्षकांना देखील सध्या बदल्यांचे वेध लागले असून शिक्षक संघटना यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र यावर्षी शिक्षकांच्या बदलयुग इतक्यातच होणार नसून आणखी किमान तीन महिने तरी या बदल्या लांबणीवर पाडण्याचे संकेत आहेत. शिक्षकांच्या बदल्यांसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करणे आवश्यक असून त्यासाठी किमान ३ महिने लागतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे घटस्थापनेनंतरच बदल्यांचे घट बसतील अशी माहिती आहे.
पंकजा मुंडे राज्याच्या ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन आणि केंद्रीय पद्धतीने करण्याचे धोरण स्वीकारले होते. या सरकारने देखील तेच धोरण कायं ठेवले . मात्र त्यावेळी ज्या सॉफ्टवेअरमध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या, त्यातील काही चुकांमुळे किंवा सॉफ्टवेअरच्या मर्यादेमुळे काही चुकीच्या बदल्या झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर विद्यमान सरकारने शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील सॉफ्टवेअर आणि धोरण ठरविण्यासाठी ५ सदस्सीय समिती गठीत केली होती.
या समितीने बदल्यांसाठी सध्या वापरण्यात येत असलेल्या सॉफ्टवेअरच्या मर्यादा असून त्यातील तंत्रज्ञान आता कालबाह्य झाले आहे असा अहवाल दिल्याची माहिती आहे. त्यासोबतच समितीने बदल्यांसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करावे आणि त्यानंतरच बदल्या करण्यात याव्यात अशी देखील शिफारस राज्य सरकारला केल्याची माहिती आहे. राज्य सरकारने अद्याप या शिफारशींवर निर्णय घेला नसला तरी समितीची शिफारस मेनी करण्याचाच मतप्रवाह प्रशासन आणि शासनात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता नवीन सॉफ्टवेअर तयार करायला किमान ३ महिने तरी लागतील आणि तोपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत अशीच परिस्थिती सध्यातरी आहे. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत देव पाण्यात घालून बसलेल्या शिक्षकांना आणखी ३ महिने तरी थांबावे लागणार असून घटस्थापनेनंतरच जिल्हा परिषदांमधून शिक्षकांच्या बदल्यांचे घट बसतील असे चित्र आहे.