बीड दि.२२ - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास व १,०००/ रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त साध्या करावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एच. एस. महाजन बीड यांनी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.१९/१२/१८ रोजी सायंकाळी ५.४५ वा. शिरुर तालुक्यातील मौजे पिंपळ्याची वाडी शिवारातील लाकडधरा नावाचे शेतात आरोपी प्रकाश मारुती सानप, वय २१ वर्षे, रा.पिंपळ्याची वाडी, ता. शिरूर, जि.बीड याने यातील फिर्यादी पीडीत अल्पवयीन मुलगी ही विहिरीवर पाणी शेंदत असताना पाठीमागून तिला लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. सदर घटनेच्या अनुषंगाने पीडीत मुलीच्या तक्रारीवरून शिरुर पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.नं.३०४/२०१८ कलम ३५४(अ) (१) भादंवि सह कलम ८ (बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक एम. आर. काझी यांनी करून आरोपिताविरुध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर न्यायालयात अंतिम दोषारोप पत्र सादर केले होते.
दरम्यान सदर प्रकरणाची सुनावणी बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सुनावणीअंती दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर न्यायाधीशांनी आरोपितास कलम ८( बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनयम सन २०१२) अंतर्गत दोषी धरून तीन वर्ष सश्रम कारावास व १०००/- रु. दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सदरील प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील एस. व्ही. सुलाखे यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज सफौ सी. एस. इंगळे यांनी पाहिले.