Advertisement

पुरवठा विभागातून गायब झाल्या ५ हजार शिधापत्रिका

प्रजापत्र | Wednesday, 21/07/2021
बातमी शेअर करा

 

 बीड : एकीकडे सामान्य नागरिकांना एक शिधापत्रिका काढण्यासाठी मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागते असे असताना बीडच्या जिल्हा पुरवठा विभागातून थोड्या थोडक्या नव्हे तब्ब्ल ५ हजारांहून अधिक शिधापत्रिका गायब झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यातील ४ हजारच्या आसपास शिधापत्रिका या पिवळ्या म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठीच्या आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सकाळीच दिले आहेत, मात्र रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची कारवाई झाली नाही, मिळालेल्या माहितीनुसार उशिरापर्यंत या प्रकरणात 'ताळमेळ ' जुळविण्याचा खेळ पुरवठा विभागात सुरु होता.

 

बीडचा जिल्हा पुरवठा विभाग सातत्याने वेगवेगळ्या कारणांनी वादात असतो. आता येथून हजारोंच्या संख्येने कोऱ्या शिधापत्रिकाच गायब झाल्या आहेत. शिधापत्रिका गायब झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी समोर आला. सुमरे ५ हजार शिधापत्रिकांना अचानक पाय फुटल्याने पुरवठा विभागात एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी भारती सागरे यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलुई. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यानंतर पुरवठा विभागात वेगळाच खेळ सुरु झाला.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार दुपारनंतर पुरवठा विभागातील आजी माजी अधिकारी, बीड तहसीलचे अधिकारी यांची बराचवेळ बंद खोलीत चर्चा झाली असून यात शिधापत्रिका गहाळ झाल्या असे म्हणण्याऐवजी त्याचा 'ताळमेळ ' कसा लावायचा याबद्दल मार्ग शोधले जात आहेत. या शिधापत्रिका काही तहसील कार्यालयांना वाटप दाखवायच्या आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्याची रक्कम भरून  घेत सध्या तरी या प्रकरणावर पडदा टाकायचा अशा हालचाली सुरु असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. यासंदर्भात प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी भारती सागरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोनला उत्तर दिले नाही.

 
गुन्हा दाखल होईल
सकाळी पुरवठा विभागातून पाच हजाराहून अधिक शिधापत्रिका गायब असल्याची बाब प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मला सांगितली. मी त्यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात गुन्हा दाखल होईल.
तुषार ठोंबरे
प्रभारी जिल्हाधिकारी, बीड

Advertisement

Advertisement