संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली तिच हेरगिरीच्या घटनेने.हेरगिरी हा कोणत्याही देशासाठी महत्त्वाचा विषय असतो अर्थात ही हेरगिरी देशाच्या संरक्षणासाठी असेल तर त्याबद्दल हरकत घेण्याचे काही कारण नाही राँ किंवा आयबी सारख्या संस्था त्यासाठी अस्तित्वात आहेत मात्र देशाच्या सार्वभौमत्वाला जपण्याचा कोणताही हेतू नसताना केवळ सत्तेच्या सार्वभौमत्वाला जपण्यासाठी ज्यावेळी हेरगिरी केली जाते त्या वेळी लोकशाही संकेतात ते बसत नाही. मुळातच कोणत्याही व्यक्तीची हेरगिरी करणे हे त्याला घटनेने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन असते मात्र तरीही अशा हेरगिरी सातत्याने सुरू असते. पिगॅससच्या माध्यमातून भारतातील केवळ पत्रकारांवरच नव्हे तर अनेक राजकीय नेत्यांवर हेरगिरी केली गेली. त्यांचे फोन हे केले गेले, या बाबी आता समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे पिगॅससस नावाची यंत्रणा आहे ती केवळ सरकारला उपलब्ध असते त्यामुळे जर अशी हॅकिंग झाली असेल तर ती कोणी केले हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही अर्थात नेहमीच्या सवयीप्रमाणे भाजपने अशी काही हेरगिरी झाल्याचे सपशेल नाकारले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीतला हा विषय पण या विषयावर बोलायला राज्या राज्यातील नेते तयार झाले आहेत. अगदी महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस या विषयात सरकारच्यावतीने बॅटिंग करायला पत्रकार परिषद घेतात यावरूनच केंद्र सरकारला यातून स्वतःची कातडी कशी वाजवायची आहे ते सहज लक्षात येऊ शकते..
मुळात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर नजर ठेवायची परंपरा भारतीय लोकशाहीत फार जुनी आहे. अगदी आयबीसारख्या यंत्रणांचा वापर यापूर्वी देखील सातत्याने विरोधी पक्षातील लोकांवर नजर ठेवण्यासाठी केला गेला. आणीबाणीच्या पूर्वी आणि आणीबाणीच्या काळातही जेपींसारख्या नेत्यांवर किंवा अगदी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर देखील नजर ठेवण्यात आली होती. मात्र ते सारे आयबी मार्फत केले जात होते आणि त्याची माहिती सत्तेतल्या लोकांना पुरवली जात होती. आता पिगॅससच्या माध्यमातून जी हेरगिरी सुरू आहे तिची माहिती भारतात नव्हे तर विदेशात एकत्रित केली जाते हे आणखी गंभीर आहे. कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरचा व
हा घाला असून आज केंद्रात सत्तेत असलेले भाजपचे सरकार हे करण्यासाठी अगदी विदेशी शक्तींचे सहाय्य घेतेय हे आणखी घातक आहे. आता मोदी शहा जोडीला अशी हेरगिरी नवीन नाही. अमित शहा गुजरातचे मंत्री असतांना त्यांनी पोलीस वापरून एका मुलीची केलेली हेरगिरी देशभरात गुजरातची अब्रू घालविणारी ठरली होती. तसेच संघ परिवारातून आलेल्या व्यक्तींची हेरगिरी करायची आणि त्यानंतर त्याच्या सीडी तयार करून राजकारणात डोईजड होऊ पाहणाऱ्यांना बाजूला करायचे हे देखील मोदी शहांना नवीन नाही. त्यामुळे मोदी शहा दिल्लीत आल्यानंतर आता देशाचा गुजरात करू पाहणार असेल तर भाजपला भारतीय जनता पार्टी ऐवजी भारतीय जासूस पार्टी हेच नाव अधिक अधिक चांगले शोभेल.