कोरोनाच्या नावावर गुत्तेदारांचे उखळ पांढरे करण्याचा धंदा?
बीड-कोरोना महामारीमध्ये कोणतीही गोष्ट तातडीने घेता येते याचा फायदा उठवत कोरोनाच्या नावाखाली गुत्तेदारांचे उखळ पांढरे करण्याचा धंदा जिल्ह्यात सुरु झाला आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उघडण्यात आलेल्या विषाणू तपासणी प्रयोगशाळेसाठी जनरेटर वापरल्याचा नावाखाली 52 दिवसांत तब्बल साडेसहा लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे.याला मंजुरी देण्याचे पत्र ‘स्वाराती’ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. विशेष म्हणजे ‘स्वाराती’ रुग्णालयाचा परिसर एक्स्प्रेस फिडरने जोडलेला असून या ठिकाणी वीज पुरवठा क्वचितच खंडित होतो.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर अंबाजोगाईच्या ‘स्वाराती’ रुग्णालयाच्या सुक्षम जीवशास्त्र विभागात विषाणू तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आली.या प्रयोगशाळेसाठी अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यास प्रयोगशाळेचे काम थांबू नये म्हणून 4 जून पासून जनरेटर भाड्याने घेतले गेले. या जनरेटरचा वापर तब्बल 52 दिवस केला गेल्याचे ‘स्वाराती’ प्रशासनाचे म्हणणे आहे. या 52 दिवसात तब्बल 168 तास वीजपुरवठा खंडित झाला होता असे ‘स्वाराती ’ म्हणत आहे. या 52 दिवसांसाठी जनरेटर भाडे म्हणून 4 लाख 16 हजार (8 हजार रुपये प्रतिदिन) आणि डिझेल पोटी 1 लाख 86 हजार खर्च दाखविण्यात आला आहे.
मुळात 128 केव्हीचे जनरेटर वापरले तरी एका दिवसासाठी फार तर 5000 रुपये भाडे आकारले जाते असे या क्षेत्रातील व्यावसायिक सांगतात,मग 8 हजार रुपये प्रतिदिन हा दर ‘स्वाराती’ प्रशासनाने कशाच्या आधारे ठरवला ? आणि ज्या रुग्णालयाचा परिसर एक्स्प्रेस फिडरने जोडलेला आहे तेथे 52 दिवसांत तब्बल 168 तास वीज पुरवठा खंडित होत असेल, म्हणजे रोज तीन तासाहून अधिक वेळ वीज पुरवठा खंडित होत असेल तर महावितरणचा कारभार कसा सुरु आहे ? आणि इतका वेळ वीज पुरवठा खंडित होत नसेल तर जनरेटर कशासाठी वापरले गेले हा देखील प्रश्न आहे.
स्वाराती प्रशासनाने जनरेटरचा 52 दिवसांच्या भाड्यापोटी डिझेलसह साडेसहा लाखांचे बिल जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीसाठी पाठविले आहे,आता कोरोनाच्या नावाखाली सुरु असलेल्या या उधळपट्टीवर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे रंजक ठरेल.