बीड दि.२८(प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ जमिनीच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले भूसुधारचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव (पी.एस.पाटील) यांनी रत्नागिरीत एमआयडीसीचे प्रादेशीक अधिकारी असताना त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर भूखंड घोटाळा केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात राज्य शासनाने त्यांची विभागीय चौकशी सुरु केली असून चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस आघाव यांना बजावण्यात आली आहे.
प्रकाश आघाव २०१४ते २०१६या काळात रत्नागिरी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी होते. ते बीडला आल्यापासून बीडमधील जमिनींच्या गैरव्यवहारात त्यांच्याभोवती संशयाची सुई फिरत आहे. नावावर रत्नागिरीत असलेल्या ‘कारनाम्यांची’ देखील चौकशी आता ऐरणीवर आली आहे. पी.एस.पाटील ऊर्फ प्रकाश आघाव पाटील हे रत्नागिरी येथे २०१४ते २०१६ या काळात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या काळात भूखंड वाटपात प्रशासकीय अनियमीतता करणे, महामंडळाच्या धोरणाच्या विसंगत भूखंड वाटप करणे, जुन्या दराने भूखंड वाटप करुन शासनाचे नुकसान करणे, समितीच्या सर्वांच्या सह्या नसताना भूखंड वाटप करणे आदी आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आले आहेत. या प्रकरणात राज्य शासनाने त्यांची विभागीय चौकशी सुरु केली असून चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे.