मुंबई-शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या डॉक्टर्ससंबंधात केलेल्या वक्तव्यानंतर मार्ड संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'मी कधी डॉक्टरांकडून औषधं घेत नाही, मी कंपाऊंडरकडून औषधं घेतो' असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. यावर मार्ड संघटनेनं 'आपली सुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे असे ग्राह्य धरावे का?' असा प्रश्न पत्रातून मुख्यमंत्र्यांना केला आहे.
मार्डने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, एकीकडे मुख्यमंत्री डॉक्टर्स कोरोना योद्धा आहेत, असं म्हणतात तर त्यांचेच सहकारी संजय राऊत अशी वलग्ना करत आहेत. डॉक्टरांना काय कळते ? हे ऐकवून दाखवत असताना याचा अर्थ काय घ्यायचा ? असा प्रश्न विचारला आहे
मागील अनेक दिवसांपासून आम्ही रात्रंदिवस जीवाची बाजी लावून काम करत आहोत. अनेकांनी कित्येक दिवस घरदाराचं, घरच्यांचं तोंड पाहिलं नाहीये. अनेक डॉक्टर्स मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. ते फक्त हेच ऐकण्यासाठी का 'डॉक्टरांना काय कळतं'? असा सवाल मार्डने केलाय.
संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं आहे ते राज्यातील तरुण डॉक्टर्सच्या खच्चीकरण करणारे असून आपली सुद्धा ही भूमिका ग्राह्य धरावी का? असा सवाल केला आहे. जर असे नसेल तर संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करून आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केलीय. असे होत नसेल तर ही आपली देखील हीच अधिकृत भूमिका आहे असं समजून तरुण डॉक्टर्स याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, इशारा मार्डने दिला आहे.

'डॉक्टरांना काय कळतं' या संजय राऊतांच्या वक्तव्याचा विरोध, मार्डचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इशारा
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा