नेकनूर - दि २३(वार्ताहर) १९ जूनच्या रात्री चौसाळा बायपास वर कंटेनरला टेम्पो आडवा लावून पारले बिस्कीटचा कंटेनर पळवून नेऊन जवळपास ३४ लाखाचा माल लंपास केला होता. त्यामधील तीन आरोपी दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० तारखेला पकडले होते तर राहिलेल्या आरोपींपैकी दोन आरोपी काल दिनांक २३ रोजी नेकनूर पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने जवळपास चार ते पाच किलोमीटर शेतामध्ये पळून पकडल्याने नेकनूर पोलिसांच्या कारवाईचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. १ ९ जून रोजी रात्री अकरा ते सव्वा अकरा च्या दरम्यान चौसाळा बायपास वर टेम्पो आडवा लावून बिस्किटाचा कंटेनर चोरट्यांनी पळवला होता. तो कंटेनर नेकनूर व लातूर पोलिसांच्या मदतीने तीन आरोपींसोबत दि.20 रोजी पकडून आणला होता. त्यामधील उर्वरित आरोपींपैकी दोन आरोपी काल नांदूर शिवारामध्ये असल्याची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सकाळीच नांदूर परिसर गाठून उसाच्या शेतामध्ये लपलेल्या आरोपींना चहूबाजूने घेराव घालून अगदी चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने त्या दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. यामध्ये दाद्या चंद्रकांत पवार रा. हंगेवाडी ता. केज व रामा पोपट शिंदे रा. नांदूर ता. केज या दोघांना नेकनूर पोलिसांनी जेरबंद केले. या आरोपींना पकडण्यामध्ये नेकनूर पोलिस स्टेशनचे स. पो. नि. लक्ष्मण केंद्रे याच बरोबर येथील पोलिस कर्मचारी दीपक खांडेकर, अमोल नवले, प्रशांत क्षिरसागर, राठोड, होमगार्ड कोरडे, वायबट त्याच बरोबर पोलीस मित्र राम काळे यांनी ही कारवाई केली. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू होती.