Advertisement

विजयकांत मुंडेंच्या संस्थेचा सभागृह घोटाळा गाजणार विधिमंडळात                 

प्रजापत्र | Tuesday, 22/06/2021
बातमी शेअर करा

 

 

 

  बीड दि.२१ (प्रतिनिधी)-शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेकडून निवडून आलेल्या आणि नंतर भाजपात उडी मारलेल्या जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडेंच्या रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठानचा सभागृह घोटाळा आता विधिमंडळात गाजणार असल्याची चिन्हे आहेत.या घोटाळ्यासंदर्भाने आ. विनायक मेटे यांनी पाठविलेल्या प्रश्नांची माहिती विधिमंडळ सचिवालयाने मागविली असून याचे उत्तर देताना प्रशासनाची धावाधाव होत आहे.

 

                  जिल्हा परिषद सदस्य असलेल्या विजयकांत मुंडेंच्या रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठानकडून सामाजिक सभागृह बांधकामात घोटाळा झाल्याचे विडा पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांच्या तक्रारीनंतर समोर आले होते. या संस्थेला केज तालुक्यात सामाजिक सभागृहाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती, मात्र संस्थेने चक्क बीड तालुक्यातील एका मंगल कार्यालयात सादर सभागृह बांधल्याचे दाखविले. या प्रकरणाची ठोंबरे यांनी तक्रार केल्या नंतर अनेक दिवस जिल्हा परिषद प्रशासनाने रेणुकामाता संस्थेची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर चौकशी पूर्ण करून सदर संस्थेला शासनाचा निधी परत करण्याचे आदेश दिले होते.या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी विजयकांत मुंडे विश्वस्त असलेल्या या संस्थेची पाठराखण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते.

 

 

जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेकडून रक्कम वसुलीचे आदेश काढल्यानंतरही यात अपेक्षित गतीने कारवाई होत नाही. या पार्श्वभूमीवर आता आ. विनायक मेटे यांनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. आ. मेटे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सचिवालयाने याबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती मागविली आहे.सभागृह इतर ठिकाणी दाखवून पैसे हडपण्यासोबतच रेणुकामाता प्रतिष्ठानवर असलेला बँकेचा बोजा लपविणे , त्यासाठी सातबारा उताऱ्यात फेरफार करणे असेही आक्षेप असून  याची उत्तरे देताना प्रशासनाची त्रेधा उडत आहे.
 

Advertisement

Advertisement