नेकनूर- आंध्र प्रदेशहून गुजरातकडे बिस्कीट घेऊन जाणार्या कंटेनरला चोरट्यांनी टेम्पो आडवा लावत दोन चालकांना मारहाण करून बिस्कीटचा कंटेनर पळवून नेला. ही घटना रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान चौसाळा बायपासवर घडली. चालकांनी घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. सदरील हा कंटेनर लातूर येथील पोलिसांनी पकडला असून तीन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कंटेनरमध्ये २५ ते ३० लाख रुपयांची बिस्कीटे होती.
अस्लम खान अली व शहेबाज खान (रा. मेवात राज्य हरियाणा) हे आपला कंटेनर (क्र. एम.एच. ४० डी.जे. ४५९६) यामध्ये आंध्राहून गुजरातकडे पारले बिस्कीट घेऊन जात होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चौसाळा बायपासवर काही चोरट्यांनी या कंटेनरला टेम्पो आडवा लावला. कंटेनर चालकाला मारहाण करत चोरट्यांनी कंटेनर पळवून नेला.
घटनेची माहिती चालकाने नेकनूर पोलिसांना दिल्यानंतर नेकनूर ठाण्याचे प्रमुख केंद्रे, दीपक खांडेकर, अमोल नवले, सुशांत सोनवणे, जायभाये, डोंगरे, पारधी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सदरील हा कंटेनर लातूर येथील जातेगावला असल्याचे तेथील पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हा कंटेनर जप्त करून तीन चोरट्यांना ताब्यात घेतले. कंटेनरमध्ये पारले बिस्कीटचे १४०० बॉक्स होते, ज्याची किंमत २५ ते ३० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर नेकनूर पोलीस लातूर येथे रवाना झाले आहेत. दरम्यान या चोरट्यांनी चालकांना मारहाण केल्यानंतर त्यांच्याकडून नगदी २० हजार आणि दोन मोबाईलही चोरून नेले होते. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पारले बिस्कीटचा कंटेनर चोरून नेत असताना बारा ते पंधरा चोरटे असल्याचे जखमींचे म्हणणे आहे. लातूर पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडले असून अन्य चोरटे फरार असल्याने या चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत. पकडलेल्यांपैकी दोन चोरटे हे बार्शी तालुक्यातील पारा येथील तर एक चोरटा केज तालुक्यातील नांदुरघाट येथील आहे. सदरील ही कारवाई गातेगाव येथील पोलीस कर्मचारी मुळे, चालक मोरे, होमगार्ड धावरे, ढोणे, बन्सल यांनी केली आहे.