बीड दि.१८ (प्रतिनिधी)-'देख-देख-देख तू यहां वहां न फेंक,देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल…तो का करे भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल,गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल…’हे गाणं अनेक भागातील नागरिकांच्या कानावर मागील महिनाभरापासून पडलं नाही.त्याच कारण असं,शहरातील कचरा संकलनाचे काम औरंगाबादच्या एका 'कनक' नावाच्या कंपनीला दिल्याची माहिती आहे.मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन मागील सहा महिन्यांपासून थकल्याने कर्मचाऱ्यांनी कचरा संकलनाचे काम बंद केले.त्यामुळे शहरात कचऱ्याच्या गाड्यांचा 'घंटा' बंद झाला असून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.
बीड नगरपालिकेच्या स्वच्छेतेच्या उदासीनतेबाबत वारंवार नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जातो.गेल्या आठ दिवसापूर्वी बीड शहरात पावसाने जोर 'धार' हजेरी लावल्याने नाल्यांचे पाणी अनेकांच्या घरात शिरले,रस्ते पाण्यात बुडाले,यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला.आता शहरातील जवळपास सर्वच प्रभागामध्ये कचऱ्याच्या घंटा गाड्या मागील महिनाभरापासून बंद आहेत.लोकांना कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न पडला आहे.ज्या भागात कचरा कुंड्या आहेत त्या ओव्हर फ्लो झाल्या असून कुंड्यातून कचरा रस्त्यावर येत तो सर्वत्र पसरला जातोय.वेतन थकल्याने खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले,त्यामुळे संपूर्ण शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ज्या काही मोजक्या भागात गाड्या सुरु आहेत तिथे २ ते चार दिवसांत एखाद्यावेळेस गाडी कचरा संकलनासाठी जाते असे त्या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.
चौकट
नगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या स्वच्छतेकडे आता तरी लक्ष द्या
बीड नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे.आज नगरपालिकेने काही भागांचा विकास केला असला तरी अनेक प्रभागात मात्र मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे चित्र आहे.पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत.नळाला १५ दिवस पाणी येत नाही,आता कचऱ्याच्या गाड्या बंद आहेत किमान निवडणूक डोळ्यावर आली असताना तरी नगराध्यक्षांनी स्वच्छता आणि मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
--------------------------------------------