Advertisement

सरपंचांच्या पुढाकारातून भायाळाच्या ग्रामस्थांच्या कोरोना तपासण्या

प्रजापत्र | Saturday, 15/08/2020
बातमी शेअर करा

बीड-पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात दोन दिवसापूर्वी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 15) गावचे सरपंच विजयसिंह (बाळा) बांगर यांनी पुढाकार घेत गावातील व्यक्तींना कोरोना तपासणीसाठी पाटोदा येथील कोव्हीड सेंटरमध्ये आणले.यावेळी शेकडो जणांचे  नमुने घेण्यात आले असून उद्या (दि.16) रात्रीपर्यंत यासर्वांचे अहवाल प्राप्त होतील अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
   सध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असून ग्रामीण भागात ही कोरोना विषाणूचे लोण पसरले आहे.दोन दिवसापूर्वी पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात एका एसटी कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाबाधिताला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.दरम्यान गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सरपंच विजयसिंह (बाळा) बांगर यांनी पुढाकार घेत शनिवार बाधितांच्या सहवासातील शेकडो जणांना स्वब देण्यासाठी पाटोद्यात आणले होते.यासर्वांचे अहवाल उद्या रात्रीपर्यंत प्राप्त होतील अशी प्राथमिक माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

 

विषाणूची धास्ती घेण्यापेक्षा स्वतःची काळजी घ्या  
 जगात सर्वत्र कोरोनाचा प्रसार झाला आहे.या विषाणूपासून वाचण्यासाठी प्राथमिक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.मास्क, सॅनिटायझर, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे या छोटया छोट्या गोष्टीच आपल्याला कोरोनापासून दूर ठेवू शकतात.गावात ग्रामपंचायतच्या वतीने प्राथमिक उपाययोजना राबविण्यात येणार असून प्रत्येकाने विषाणूची धास्ती घेण्यापेक्षा स्वतःची काळजी घेणे कधीही उत्तम आहे.
विजयसिंह बांगर (सरपंच, भायाळा)

Advertisement

Advertisement