बीड-जिल्ह्यातील वेगवेगळ्या कोविड हॉस्पिटलमध्ये शासनाचे निकष आहेत म्हणून सीसीटिव्ही बसविण्यात आले. बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सीसीटिव्ही बसवायचे म्हणून तब्बल सव्वा कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. मात्र आता हे सीसीटीव्ही केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. अडचणीच्या वेळी येथील फुटेज सुध्दा उपलब्ध होत नाही अशी परिस्थिती आहे.
कोरोना वॉर्डांमध्ये रुग्णांसोबत इतरांना ठेवता येत नाही. अशावेळी विलगीकरण केलेल्या कक्षात काय चालले आहे आणि तेथे काही अडचणी आहेत का हे तातडीने लक्षात यावे म्हणून कोरोना वॉर्डात सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश आयसीएमआरने दिले होते. त्यानूसार बीडमध्ये जिल्हा रुग्णालय, लोखंडी सावरगाव येथील वृध्दत्व निवारण केंद्र, स्त्री रुग्णालय, नर्सींग इमारत, केजचे उपजिल्हा रुग्णालय, परळीचे उपजिल्हा रुग्णालय, आष्टी आणि तेलगावचे ट्रॉमा केअर युनिट आदि ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आल्या आहेत. यासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातील जिल्हा रुग्णालय बीड आणि परळी व केजच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रत्येकी 25 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून हा निधी बिनबोभाटपणे देण्यात आला. मात्र आता हे सीसीटीव्ही केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. कोरोना वॉर्डात सीसीटीव्ही बसविलेले असतानाही रुग्णांच्या अडचणी प्रशासनाला कधी दिसल्या नाहीत त्यामुळे सव्वाकोटीच्या उधळपट्टीनंतरही ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे.