बीड दि.२ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात कोरोनावरील उपचारासाठी लागणाऱ्या रेमडीसेविर किंवा इतर इंजेक्शनचा तुटवडा चर्चेत आला होता, मात्र आता जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांना देखील साधे खोकल्याचे औषध देखील मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील १५ दिवसांपासून हीच परिस्थिती असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
बीड जिल्हा रुग्णालयात सध्या वेगवेगळ्या औषधांचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा आहे. त्यातही कोरोना रुगांसाठी तर परिस्थिती अधिकच बिकट आहे. कोरोना रुग्णांना मोठ्याप्रमाणावर कफ सिरप द्यावे लागते. अनेक रुग्णांचा खोकला अनेक दिवस बरा होत नाही . मात्र मागील १५ दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डातील कफ सिरप संपलेले आहे. रुग्ण मागणी करतात, मात्र ते औषध रुग्णालयात उपलब्ध नाही, आणि डॉक्टर बाहेरून आणायला देखील लिहून देत नाहीत, यात रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. यासोबतच डॉक्सि सारख्या गोळ्या आणि इतरही अनेक औषधांचा तुटवडा सध्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.